विरोधाभासी शेतकरी संघटना
आजच्या सा-या शेतकरी संघटनांचे गुणविशेष
त्यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीशी राहलेले नसून त्या वेगवेगळ्या
नावाने व त्या चालवणाऱ्या नेत्यांच्या कार्यपध्दतीनेच ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.
यातील मूळची मातृसंघटना जी आज शरद जोशींचे नाव घेत आपले वेगळे अस्तित्व राखून आहे
त्याचबरोबर राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथ दादांची सावत्र
शेतकरी संघटना, विदर्भात एकेकाळी संघटनेची पाळेमुळे रुजवणा-या परंतु कोण्या
कारणाने शेतकरी संघटनेपासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांचे नवे प्रयत्न व आताशा
उगवलेल्या शेतकरी संघटनेचे बिरूद लावणाऱ्या अशा अनेक संघटना यांचा समावेश होतो.
खरे म्हणजे या सा-या शेतकरी संघटनांचा किमान माध्यमांतील शेतकऱ्यांप्रती जाहीर
होणारा कळवळा लक्षात घेता आपल्या पाठीमागे एवढी मोठी ताकद असल्याचा महाराष्ट्रातील
शेतकऱ्यांना आनंदच वाटायला हवा. कारण एवढ्या संघटना व त्यांचे नेतृत्व पाठीशी
असतांना आता आपले सारे प्रश्न चुटकीसरशी मिटतील असा आत्मविश्वास वाटण्याऐवजी
सामान्य शेतकरी मात्र साध्या साध्या समस्यांनी ग्रस्त होत आता आपला कोणी वाली आहे
का याच्या शोधात असलेला दिसतो. एकीकडे महत्प्रयासाने अर्थवादाकडे आशेने पहात
असलेला शेतकरी शेवटी जातीयवादी आधार शोधण्याच्या प्रयत्नात वेगळ्या वाटेने जाऊ
लागल्याचेही चित्र दिसू लागले आहे.
या सा-या शेतकरी संघटना विविध नावाने
ओळखल्या जात असल्या तरी त्यांच्या उगमापासूनच एका विरोधाभास व वेगळेपणा
टिकवण्यासाठी घेतलेल्या भूमिकांचा समावेश असल्याने त्यांचे विराधाभासी शेतकरी
संघटना असे नामाभिषान करावयास हरकत नाही. या साऱ्या शेतकरी संघटनांचा समाजकारणात व
विशेषतः राजकारणात वावरण्याचा पासवर्ड मात्र एकच असून शरद जोशींचा विचार हेच आमचे
भांडवल हे मिरवत शरद जोशींना शेतक-यांचे पंचप्राण, महात्मा, युगात्मा
म्हटल्याशिवाय त्यांचे कुठलेही कार्यक्रम सुरू होत नाहीत. याबाबत कुणाला हरकत
घेण्याचे कारण नाही परंतु शरद जोशींना शेतक-यांच्या प्रश्न व समस्यांबाबत जो काही
कळवळा व समज होती तिचा लवलेशही नसलेल्या या शेतक-यांच्या संघटना शेतक-यांचे अगदी
गाव पातळीवरच्याही समस्या हाताळण्यात अपयशी ठरल्या असून शेतक-यांचे प्रश्न मात्र
दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे या साऱ्या संघटनांच्या खिसगणतीतही नसल्याचे दिसते
आहे.
घरातला आधारवड जावा व साऱ्यांची अवस्था
सैरभैर व्हावी तसे मातृ शेतकरी संघटनेचे झाले आहे. विचारांचा स्वामित्व हक्क तसा
अजून मान्य न झाल्याने शरद जोशींच्या वैचारिक वारशापेक्षा त्यांच्या इतर वारशावरचा
हक्क अबाधित ठेवण्यातच त्यांची सारी मदार पणाला लागते आहे. वैचारिक नेतृत्वाच्या
अभावामुळे प्रत्यक्ष कार्यापेक्षा शरद जोशींची आळवणी करण्यातच आपले अस्तित्व
असल्याचे लक्षात आल्याने शरद जोशींशी भावनिक नाते असल्यांना दिलासा देत रहाणे व
शरद जोशींच्या विरोधात कुठे काही खुट्ट झाले की चवताळून उठणे हेच त्यांचे मुख्य
काम उरले आहे. मागच्या शतकात आंध्रचे तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेले एन टी रामाराव
हे एक प्रखर व प्रभावी राजकीय नेतृत्व म्हणून गाजलेले असले तरी त्यांच्या
निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसा व घरगुती वारसा यांच्या संघर्षातील त्यांचे जावई
चंद्राबाबू नायडू व दुसरी बायको लक्ष्मीपार्वती यांच्यातील कलगीतुरा तसा जगजाहीर
असून शेवटी वैचारिक वारशालाच सर्वसामान्यांनी मान्यता देत चंद्राबाबूंना प्राधान्य
दिले हे लक्षात घ्यावे लागेल. शरद जोशींचा विचार मानणारे खरे कार्यकर्ते या साऱ्या
गदारोळापासून दूरच रहाण्याचे पसंत करीत असून शरद जोशींच्या नावाने ओळखली जाणारी
संघटना आता संघटनात्मक बाबींपेक्षा त्यांच्या स्मारक वगैरेसारख्या कार्यक्रमातून
सक्रिय झाल्याचे दिसते आहे. दुसरीकडे सत्ताकारणाला धक्का न लावणा-या तंत्रज्ञानाचा
त्यांनी आता मुख्य मुद्दा घेतला असून सत्ताधा-यांशी प्रत्यक्ष संघर्ष टाळण्याचा
प्रयत्न केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उगमच ज्या
जातीयवादाच्या विरोधातून झाला त्याच्या नेमके अगदी उलटी त्यांची राजकीय वाटचाल
चालू असून खरा विरोधाभास त्यांच्या भूमिकातून दिसतो आहे. काही गोष्टींचा मी
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने काही गौप्यस्फोट करायला काही हरकत नसावी.
शेतकरी संघटना एन डी एत सामील झाली त्यात संघटनेचा जातीयवादी पक्षांपासून दूर
रहाण्याच्या भूमिकेचा पराजय असल्याने आम्ही आमची वेगळी स्वाभिमानी शेतकरी संघटना
स्थापन करतो यातून या संघटनेचा जन्म झाला. मात्र यामागच्या घडामोडींची त्यांना माहिती
दिसत नाही. ही युती होण्यापूर्वी नागपूरच्या कार्यकारिणीत काही खडाजंगी झाली.
शेतकरी संघटनेची या निवडणुकीतील राजकीय भूमिका या विषयावर चर्चा होत असतांनाच
गोविंद जोशीसारख्या कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेने दबाब गट म्हणूनच कार्यरत
रहावे व निवडणुकांमधला आपला आजवरचा अनुभव लक्षात घेता आपण निवडणुकांच्या भानगडीत
पडू नये असे मत मांडले. मात्र रघुनाथदादा, वामनराव चटप यांचा एक गट काही झाले तरी
आता आपल्या निवडणुकांशिवाय पर्याय नाही या मतावर ठाम होता. शरद जोशींची अवस्था
विचित्र झाली. निवडणुका नकोत हा निर्णय आताच घेतला तर राजकारणाची चव घेतलेल्या
कार्यकर्त्यांनी वेगळा निर्णय घेतल्यास आणीबाणीची परिस्थिती येत शेतकरी संघटनेच्या
अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला असता. म्हणून चर्चेतला पुढचा भाग युती कोणाशी
यावर जास्त उहापोह न करता भाजपा व काँग्रेस यांना समान अंतरावर ठेवत ज्यांच्याशी
आपली बोलणी लाभदायक ठरतील त्यांच्याशी युती करावी असे ठरत रघुनाथदादा व वामनराव
चटप यांना दिल्लीला बोलणी करण्यासाठी पाठवायचा निर्णय झाला. हा निर्णय शेतकरी
संघटनेच्या तत्वांपेक्षा या दोन्ही पक्षांचीही तत्वे डोळ्याआड करत कांहीची
निवडणुकीय सोय यासाठी घेतल्याचे दिसते. दिल्लित काँग्रेसच्या अहमद पटेलांनी सोनिया
गांधीकडून वेळ मिळवून तुमची भेट घालून देतो तोवर थांबा असे सांगितल्यावर
मधल्याकाळात हे दोघे अशा कामासाठी आल्याची बातमी प्रमोद महाजनांना लागली व त्यातील
गांभिर्य लक्षात येताच त्यांनी या दोघांना पाचारण करत सारी निवडणुकीची गणितं
समजावत एनडीएच कशी सोईची राहील या दृष्टीने बोलणी निर्णायक स्वरूपाला आणली.
त्याचवेळी अशी युती होत असल्याची बातमी माध्यमातून प्रसारित होईल हेही बघितले
गेले. शरद जोशींना अशी बालणी चालू आहेत याची माहिती असली तरी युती झाल्याची बातमी
त्यांनाही सर्वसामान्य शेतक-यांप्रमाणे सातच्या बातम्यातूनच समजली असावी. दादा व
चटप हे दिल्लीच्या डावपेची राजकारणाचे बळी ठरत असतांनाच माध्यमातून बातम्यांतून हे
वृत्त प्रसारित झाल्याने परतीचे दोर कापले गेले व त्यानंतर झालेली युती कशी
फायद्याची आहे हे पटवण्यात येऊ लागले. स्वतः शरद जोशी या निर्णयामुळे समाधानी
असल्याचे दिसत नाही कारण नंतरच्या निवडणुक प्रचारात ते व मी बरोबर असतांना त्यांनी
या साऱ्या प्रकाराबाबत अनेकवेळा नाराजी प्रकट केली होती व जे काही चालले आहे ते
शेतकरी संघटनेच्या पिंडाविरूध्द आहे अशी त्यांची भावना होती.
याचा प्रत्यय पुढेही आलेला दिसतो.
निवडणुकांनंतर शरद जोशींना राज्यसभेवर घ्यावे या निर्णयाची अमलबजावणी ज्या
सन्मानाने व्हायला हवी होती तेवढे दूर्लक्ष होऊ लागल्याचे स्पष्ट होऊ लागले.
भाजपाच्या कोट्यातून जागा देण्याविषयी नाराजी स्पष्ट होताच शिवसेनेच्या बाळासाहेब
ठाकऱ्यांनी मात्र आपण शब्द दिला आहे तो पाळलाच पाहिजे अशी भूमिका घेत शेवटी
शिवसेनेच्या कोट्यातून शरद जोशी राज्यसभेवर गेले. आणि त्या नंतरचा इतिहास सर्वांना
माहितच आहे.
म्हणजे ज्या भाजपावर नाराजी व्यक्त करीत
राजू शेट्टींनी शेतकरी संघटनेची वेगळी चूल मांडली त्यांनाच शेवटी भाजपाबरोबर जात
आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करावी लागली यासारखा विरोधाभास कुठेही नसेल.
रघुनाथ दादांची संघटना ही वेगळी शेतकरी संघटना नसून शेतकरी संघटनेतील एक वेगळा गट
स्वतंत्रपणे आपले अस्तित्व राखून आहे. शेतकरी प्रश्न सोडवण्यातील त्यांची
प्रामाणिकता आजतरी दिसते आहे. एकदा सत्ता मिळाल्यानंतर त्यांचाही राजू शेट्टी होऊ
नये म्हणजे मिळवली. राजू शेट्टींच्या राजकीय यशाचा एक महत्वाचा भाग विसरला जातो
त्यामागे शेतकरी संघटनेच्या प्रभावापेक्षा त्या भागातील साखरपट्ट्याचे स्थानिक
राजकारण, त्यातील जातीय समीकरणे यांचा प्रभाव जास्त दिसतो. नवी संघटना काढण्यामागे
भाजपाशी झालेल्या युतीचे तात्कालिक कारण असले तरी साखरपट्ट्यातील उस आंदोलन
केंद्रस्थानी असलेल्या भागात नेतृत्वाच्या वर्चस्वावरून रघुनाथदादांशी करावा
लागणारा संघर्ष व मातृ शेतकरी संघटनेच्या मुख्यालयातून राबवली जाणारी तोडा-फोडा व
राज्य करा निती हे खरे कारण असावे. राजू शेट्टींचा वापर काँग्रेसला तसा निरूपयोगी
वाटत गेल्याने राजकीय विजनवासापेक्षा भाजपाशी जुळवून घेणे राजू शेट्टींना भाग पडले
असावे. मात्र शेतकरी चळवळीतील एक मोठा घास घेतल्याची भाजपाची खेळी अचूक ठरली असून
ही संघटना आता शेतक-यांबाबत तशी निरुपयोगी ठरणार असल्याचे दिसते आहे. शेतक-यांबाबत
जाहीर भाषणांतून ते जे काही बोलतात त्याचा लवलेशही ते सत्तेत असलेल्या कारभारात
दिसत नाही. आता ते व्यवस्थेचा एक भाग झाले असून शेतकरी हितापेक्षा त्यांनी उभा
केलेला डोलारा सांभाळत रहाण्याचे महत्वाचे काम त्यांच्याकडे उरले आहे.
यात दखल घ्यावी असे शेतकरी संघटनेची
बांधिलकी मानणा-या विदर्भातील काही प्रामाणिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न दखलपात्र
आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यपध्दतीतून निर्माण झालेल्या वितुष्टातून कुठलाही
कडवटपणा न दाखवता दूर गेलेली मंडळी आजही शेतक-यांच्या प्रश्नांवर तेवढीच
अभ्यासपूर्ण मांडणी करतांना दिसतात. विजय जावंधिया, प्रकाश पोहरे व लक्ष्मण वंगे
यांनी तर अखिल भारतीय स्तरावर किसान एकताच्या मंचावर शेतकरी संघटनेच्याच नावाने
कार्य सुरू केले असून जागतिक स्तरावर शेतमाल भावाची एक नवी मांडणी, विशेषतः आजच्या
सरकारची आयात निर्यातीची धोरणे व त्याचा भारतीय शेतमाल बाजारावर होणारा परिणाम
यावर अभ्यासपूर्ण प्रबोधन सुरु केले आहे. चंद्रकांत वानखेडे हे तरूणांमध्ये विशेष
लोकप्रिय असून त्यांचीही अभ्यासपूर्ण भाषणे व विश्लेषण गांभिर्याने घेतले जात आहे.
शेवटी शरद जोशी ही व्यक्ती की विचार यात
त्यांनी मांडलेला विचार यात त्यांचा विचारच प्रबळ ठरणार असून शेतकरी संघटनेच्या
सा-या वाटचालीत त्यांचाही तोच प्रयत्न होता. विचाराबरोबर त्याची सक्रिय अमलबजावणी
यावरही शरद जोशींचा कटाक्ष असे. त्यामुळे बैठकीला येणारा कार्यकर्ता आंदोलनात येतो
की नाही यावर त्यांचे जातीने लक्ष असे. दुर्दैवाने शरद जोशींनी आपल्या जीवनाच्या
योगदानातून उभारलेली ही चळवळ सध्यातरी स्थित्यंतरातून जात असल्याने त्यांचा विचार
आत्मसात करून तो नव्याने मांडणारी नवी पिढी तयार होत नाही तोवर दुधाची तहान ताकावर
भागवणे आपल्या, म्हणजे शेतक-यांच्या हाती आहे.
डॉ. गिरधर पाटील 9422263689
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा