कल्पनेतील समृध्दीचे वास्तव.
अलिकडे नव्या सरकारला दोन वर्ष पूर्ण
झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपली व्हीजन स्पष्ट करणारा कार्यक्रम बघण्यात आला. नेमका
असा कार्यक्रम निवडणुकांपूर्वी झालेला आठवतो व त्यात राज्याच्या समोर असणा-या
सा-या गंभीर प्रश्नांबाबत तुमची काय भूमिका वा दुरदृष्टी आहे याचे चित्र स्पष्ट
करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर विश्लेषण करण्याजोगी कारणे काहीही असली तरी
चांगल्या मताधिक्याने सध्याचे सरकार स्थापनही झाले. मात्र आता या सरकारला त्याच
प्रकारचे प्रश्न विचारत दुरदृष्टी वा व्हीजन काय आहे हे विचारण्यात काय प्रयोजन
आहे हे कळत नाही. यामुळे झाले काय की निवडणुकीपूर्वी उभे राहिलेल्या आश्वासनांच्या
चित्राचे या दोन वर्षाच्या सत्ताकाळात नेमके काय झाले याचा आढावा न घेता आम्ही परत काय करणार याचाच पाढा वाचण्यात धन्यता
मानली गेली. प्रत्यक्षात दुष्काळात होरपळणा-या ग्रामीण जनतेचा आक्रोश लक्षात घेता
सरकारची जाहीर भूमिका व प्रत्यक्षातले वर्तन वा धोरणे याचा लेखाजोखा होणे आवश्यक
आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात नेहमी
सरकारने केलेल्या मदतीचे आकडे डोकावत असतात. ही मदत प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत
पोहचली अथवा नाही याची पडताळणी करणारी कुठलीही सक्षम यंत्रणा आपल्याकडे नाही. आपले
प्रशासन या मदती वाटपाचे निकष असे ठरवत असते की आलेल्या लाभार्थ्याला काहीतरी
सरकारी कारण सांगत परत पाठवणे यातच ते धन्यता मानत असतात. यामुळे या मदतींचा
अनुशेष साचत येवढा होत जातो की वर्षाअखेर अनेक जिल्हाधिकारी ही न वाटलेली मदत परत
पाठवीत असतात. म्हणजे शेतक-यांसाठी दिलेल्या मदतीचे आकडे ज्या उत्साहाने जाहीर
होतात त्या उत्साहाने प्रत्यक्ष किती मदत वाटली हे जाहीर केले जात नाही.
शेतक-यांकडून येणा-या तक्रारींमध्ये या ताज्या मदतींपेक्षा गेल्या कित्येक
वर्षांपासून देय असलेली अनुदाने अजूनही मिळालेली नाहीत या स्वरुपाच्या असतात. शिवाय
अशा मदती वाटपातील अनेक गैरप्रकारांच्या तक्रारी असून त्यांच्या चौकशा वा कारवाई
झाल्याची ठळक उदाहरणे नाहीत. या सा-या मदती वाटपातील गैरप्रकार थांबवण्यासाठी एकादी
मदत जाहीर झाल्यानंतर त्या मदतीचे निकष काय आहेत, त्यासाठी कोण पात्र आहेत व
त्यानुसार अशी मदत ही गाववार कुठल्या लाभार्थ्यांना देण्यात आली याची पारदर्शक
स्वरुपातली माहीती सरकारी संकेतस्थळावर जाहीर करणे हे सरकारला मुळीच अशक्य नाही
मात्र ते का केले जात नाही हे कळत नाही.
मुख्यमंत्र्यांचा दुसरा हुकूमी पत्ता
म्हणजे जलस्वराज योजना. दुष्काळात होरपळणा-या, पाण्याच्या थेंबाथेंबासाठी मोताद जनतेला, आपल्या
गावात भरभरून पाणी येत असल्याची योजना आकर्षक न वाटती तरच नवल होते. तसे पहायला
गेले तर या योजनेत नवे असे काही नाही. अगोदरच्या सरकारने हीच योजना वेगळ्या नावाने
राबवली होती. सरकारांचे सोडा ग्रामीण जीवनातील पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर अगदी
अण्णा हजारे, पोपटराव पगार व सुरेश खानापूरकर सारख्यांनी यशस्वीपणे पाण्याची
उपलब्धता व नियोजन करता येते हे सप्रमाण दाखवून दिले होते. सरकारी अधिका-यांनी
सरकारी खर्चाने अनेक सहली काढून हे प्रकल्प बघून त्यांची वाखाणणीही केली होती,
मात्र हे सरकारी अधिकारी आपल्या कामावर गेले की याबद्दल ब्र शब्द काढत नसत. खुद्द
सरकार म्हणजे मंत्री वा लोकप्रतिनिधींना अशा योजनांमध्ये स्वारस्य नसायचे. खाजगीत
बोलतांना ते म्हणायचे ज्या योजनांचे एस्टिमेट कोणीही करू शकतो, ज्या टेंडरात व्यवस्थेला
काही मिळण्याची काही एक शक्यता नाही अशा भाकड योजना आम्ही कशासाठी राबवायच्या ? त्यामुळे
हे सारे प्रयोग यशस्वी ठरूनही बासनात बांधून ठेवण्यात आले होते.
सरकारी व्यवस्था अशारितीने आपले स्वार्थ
सांभाळत कार्यरत असतांनाच कर्मधर्मसंयोगाने याच सरकारच्या कार्यकाळात दुष्काळ आला.
या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या घोषणा जरी मोठ्या होत्या तरी
प्रत्यक्षातले प्रयत्न फारच तोकडे असल्याचे सिध्द झाले. अनेक पर्यायी मार्गांचा
शोध घेणे सुरू होते तरी सरकारने स्वतःहून याबाबत काही पावले उचलली नाहीत. शेवटी
ग्रामीण जनता सक्रिय होत त्यांनी समाजाला आवाहन करताच बिगर सरकारी यंत्रणा यात
उतरल्या व सरकारची मदत न घेता त्यांनी पाणलोट व पाण्याच्या व्यवस्थापनाची कामे
हाती घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. यात नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे
ठळकपणे दिसत असले तरी अनेक ठिकाणी गावपातळीवर लोक सहभागाने तेथील तरूणानी अशी कामे
हाती घेतली होती. यातून एक चित्र स्पष्ट होऊ लागले की साधी साधी कामे करायला सरकार
नावाची व्यवस्था जो वेळ वा पैसा खर्च करते त्याच्या कित्येक त्वरेने व स्वस्तात ही
कामे करणे शक्य आहे. म्हणजे सरकार अशा रितीने उघडे पडत असतांनाच खाजगी क्षेत्रात
महाकाय कामे अगदी स्वस्तात, म्हणजे सरकारी हिशोबाने ज्या कामाला पंचवीस कोटी
लागायचे ती कामे अवघी अडीच कोटीत झाल्याची उदाहरणे सिध्द झाली. हे सारे धोके
लक्षात येताच सरकारी यंत्रणा सक्रीय झाली व आपले अपयश झाकण्यासाठी का होईना
जलस्वराज योजनेचा गाजावाजा सुरू झाला. म्हणजे सरकारी जलस्वराज योजना ही
शेतक-यांच्या हितासाठी नसून केवळ आपले पितळ उघडे पडू नये म्हणून ज्या योजना खुद्द
सरकानेच बासनात बाधून ठेवल्या होत्या त्या अमलात आणत हुकलेले श्रेय घेण्याचा
प्रयत्न झाला.
मुख्यमंत्र्यांच्या जाहीर भाषणातील
माहिती वा आकडेवारी ही विश्वासार्ह असावी कारण ते राज्याचे एक प्रमुख वैधानिक पद
आहे. राज्य शासनाने तीन लाख विहिरी शेतक-यांसाठी देण्यात आल्याची एक जाहीर झालेली
माहिती होती. यावर कोणी तशी हरकत घेतली नाही कारण ती माहिती खरी आहे वा खोटी याची
पडताळणी करणारी कुठलीही यंत्रणा आपल्याकडे नाही. मात्र यातली काही कुणकुण एका
राजकीय पक्षाच्या प्रमुखाला लागताच त्यांनी या तीन लाख विहिरी कुठे दिल्यात याची
माहिती विचारली. अर्थात या प्रश्नाबद्दल सरकारकडून काहीच जाहीर खुलासा न झाल्याने
इतरही माहिती कितपत खरी याबद्दल शंकेचे वातावरण तयार व्हायची शक्यता आहे.
सरकारवरचा सर्वसामान्यांचा विश्वास डळमळू नये म्हणून सरकारनेच काळजी घेणे आवश्यक
आहे.
डॉ. गिरधर पाटील 9422263689