बाजार समित्यांतील भयाण वास्तव
स्वार्थ ही मूलभूत मानवी प्रेरणांपैकी
एक महत्वाची प्रेरणा समजली जाते. आपल्या बहूतांशी व्यावहारिक पातळीवरच्या
देवाण-घेवाण, अटी-शर्थींच्या मागे स्वार्थच असल्याचे दिसून येते. आपल्या
अस्तित्वाशी निगडीत असणारा स्वार्थ हा नैसर्गिक असला तरी जेव्हा तो विकृत स्वरूपात
प्रकट होऊ लागतो तेव्हा मात्र त्याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ येते. या सा-या
प्रकाराचे समर्पक उदाहरण आपल्या बाजार समित्यांच्या कार्यपध्दतीत कायदा असूनसुध्दा
कशा विकृत स्वरूपात राजरोसपणे राबवले जाते यात दिसून येते. मानवी जीवनाचा इतिहास
हा शेतमाल लुटीचा इतिहास समजला जातो, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होत असते हे
या बाजाराच्या एकंदरीत व्यावहारिक गतविधींवरून ठरवता येते.
मध्यंतरीच्या काळात अमदाबादच्या प्रसिध्द
व्यवस्थापन संस्थेतील काही संशोधकांनी अमहदाबाद, कोलकत्ता व चेन्नई येथील शेतमाल
बाजारांचा शास्त्रीय अभ्यास व संशोधन करून काही महत्वाचे नित्कर्ष काढले आहेत.
प्रत्यक्ष कायदा, त्याला अभिप्रेत असलेली कार्यपध्दती यापैकी काहीही या
बाजारांमध्ये नसल्याचे त्यांना दिसून आले. इतर प्रगत बाजारांच्या तुलनेत या शेतमाल
बाजारात साधी वजनमापे करण्याचीही सोय नसल्याने प्रतवारी, साठवणीसाठी गोदामे वा
शीतगृहे, वितरण व्यवस्था यांचा अभाव दिसून आला.
या शेतमाल बाजाराच्या बाबतीत इतर समाजात
जे प्रचंड गैरसमज पसरवले गेले आहेत ते सर्व या शोषक व्यवस्थेला पूरक ठरतील अशा
प्रकारचे आहेत. आता ही सारी व्यवस्थाच मोडीत निघत असल्याने त्यात दुरूस्त्या
करण्यापेक्षा येणा-या नव्या व्यवस्थेत या विकृती कशा कार्यरत होणार नाहीत याकडे
लक्ष दिले पाहिजे. पहिला गैरसमज म्हणजे या बाजार समित्या शेतक-यांच्या असून
त्यांच्या हितासाठी स्थापन झाल्या आहेत. शेतक-यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी याचा
कारभार बघत असल्याने त्यांच्या हिताची जपणूक आपोआपच होते असेही समजले जाते.
प्रत्यक्षात काय आहे ? शेतक-यांचे प्रतिनिधी समजले जाणारे ज्या वर्गातून निवडून
येतात त्यांचा प्रत्यक्ष शेती पिकवणे व या बाजारात येऊन माल विकणे याच्याशी असेलच
असे नाही. कारण ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायट्यांचे संचालक हे यांना
निवडून देत असतात. अर्थात हे सारे ग्रामीण व्यवस्थेशी जुळलेले असले तरी त्यात
निवडून आलेले आरक्षित स्त्री, इतर मागास व अनुसूचित जाती यांचे प्रमाण लक्षात घेता
पन्नास टक्के प्रतिनिधी थेट शेतीशी संबंध नसणारे असतात. अशा बाजाराचे नियंत्रण
खरोखरच शेतक-यांना द्यायचे असेल तर जे शेतकरी प्रत्यक्ष त्यांचा शेतमाल या बाजारात
विकायला येतात त्यांचा स्वतंत्र मतदारसंघ तयार करून त्यातून शेतकरी प्रतिनिधी
निवडून यायला हवे होते. ते आपण होऊ दिलेले नाही.
दुसरा महत्वाचा गैरसमज म्हणजे या बाजार
समित्या कायद्यानुसार चालवल्या जातात. कोणीही सूज्ञ व विवेकी माणूस या बाजार
समित्यांचे कामकाज बघतो त्याला या तफावती लक्षात आल्यावाचून रहात नाहीत. कायदा
म्हणतो या बाजारात शेतमाल आल्यानंतर त्याचे योग्य त्या यंत्रणेद्वारा मेट्रीक
मोजमाप होऊन त्याची पावती शेतक-याला दिली पाहिजे. शेतमालाची किंमत ठरवतांना या
पावतीचा संदर्भ घ्यावा. खुल्या लिलावात झालेल्या विक्रिची माहिती सदर शेतक-यांला
द्यावी त्याचा माल कोणत्या खरेदीदाराला काय भावाने विकली याचीही माहिती शेतक-याला
देणे बंधनकारक आहे. विक्री झालेल्या मालाचे पैसे चोवीस तासाच्या आत शेतक-याला
मिळणे आवश्यक आहे व ती जबाबदारी बाजार समितीच्या व्यवस्थापनाची आहे. सरकारने जाहीर
केलेल्या किमान हमी दराची अंमलबजावणीही बाजार समित्यांवरच टाकलेली आहे. आता या
सा-या मूलभूत तरतुदी पाळल्या जातात की नाही हे जे शेतकरी प्रत्यक्ष या बाजारात माल
विकायला जातात यांच्यापेक्षा कोणीही सांगू शकणार नाही.
आता येवढे गैरप्रकार होत असतांना
याविरोधात काही उठाव का झाले नाहीत असाही प्रश्न उपस्थित होतो. प्रत्यक्षात असे
बरेच उठाव झाल्याचे दिसून येते मात्र या बाजारात शेतक-यांची संघटित ताकद कमी पडते
व केलेल्या बंडखोरीची मोठी शिक्षाही त्याला भोगावी लागते. नाशिकच्या बाजार समितीत
पालेभाज्यांचे लिलाव वजनाने न होता शंभराच्या जुड्यांनी व त्यातही शंभर म्हणजे
एकशे पंधरा असा हिशोब धरला जाई. ज्या शेतक-यांनी या विरोधात आवाज उठवण्याचा
प्रयत्न केला त्यांना व्यापारी व आडत्यांच्या हस्तकांनी रिंगण करून प्रचंड मारहाण
केल्याची उदाहरणे आहेत. अशा मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेतक-यांची तक्रार समोरच
असलेल्या पोलिस ठाण्यात नोंदली जात नसे. शेवटी यावर मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
केल्यावर त्यांना काही दंडाधिकार नसल्याने नियंत्रण करणा-या संस्थांवरच त्यांनी
याचा ठपका ठेवला आहे. बाजार समित्यांचे नियंत्रण करणारे जिल्हा उपनिबंधक व पणन
खाते याबाबत काही बोलायला व करायला तयार नाहीत तेव्हा शेतक-यांच्या विरोधातील ही
आघाडी किती राक्षसी आहे हे लक्षात येते.
ठिकठिकाणच्या बाजार समित्या या त्या
भागातील शोषण संस्थाने झाल्या आहेत. आंब्याची कोकणात, कांद्याची लासलगावांत,
गुळाची कोल्हापूरात, हळदीची सांगलीत, डाळींबांची सटाण्यात व सोलापूरात, संत्र्याची
नागपूरात, द्राक्षांची नाशिक व सांगलीत या पिकांचा देशभरातील सारा बाजार नियंत्रित
करणा-या व्यापारी आडत्यांच्या एकाधिकार तयार झालेल्या टोळ्या कार्यरत आहेत. या
शेतमालाच्या सा-या पुरवठा साखळ्या या टोळ्यांच्या हाती गेल्याने त्यांनी आजवर यात
पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ दिलेल्या नाहीत. त्यांनी संपाची हाळी दिली की सरकार
भितीने थरथर कापते. त्यांच्या हाती एकवटलेल्या प्रचंड आर्थिक ताकदीमुळे ते सहकार व
पणन खाते, बाजार समित्यांचे व्यवस्थापन, स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलिस ठाणी व
स्थानिक गुंड यांना काबीज करीत राज्य करीत असतात. आजही वाशीच्या बाजार समितीत सकाळ
पासून सायंकाळ पर्यंत ज्यांचा शेती व शेतमाल विक्रिशी काहीही संबंध नाही अशांच्या
लाल दिव्यांच्या गाड्या आपली पाकिटे गोळा करण्यासाठी रिघ लावत असतात. शासनाने
शेतकरी आपला शेतमाल कुठेही विकू शकतील असे जाहीर करून सुध्दा मुलुंड व दहिसर
नाक्यावर शेतक-यांच्या मालाच्या गाड्या फोडल्या जातात व पोलिस त्यांची साधी
तक्रारही घेत नाहीत.
असा हा शेतक-यांच्या दुर्दैवाचा परिपाठ कधी संपेल हे मात्र सांगता येत नाही.
डॉ. गिरधर पाटील 9422263689.