नेत्यांना घबाडयोग,प्रशासनाला वेतनयोग तर शेतक-याला मरणयोग !!
जनता व
त्यांनी निवडून दिलेले सरकार यांचे आपसातील परस्पर संबंध कसे असावेत हे आजच्या
लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या एकंदरीत वर्तवणुकीवरून जोखता येते. या संबंधातील खरे
ताणतणाव आपल्याला ग्रामीण स्तरावर दिसून येतात. तेथील जनतेचे आपल्या घटनादत्त वा
वैधानिक अधिकारांबाबतचे अज्ञान, निरक्षरता, असंघटितपणा व ग्रामीण स्तरावरील
हलाखीच्या जीवनाने आलेली अगतिकता यामुळे त्यांना सरकार या व्यवस्थेची खरी गरज
असतांना सरकारच त्यांच्याशी विचित्रपणे वागत असते.
राज्यातील दुष्काळ व त्यात होरपळून निघणारा शेतकरी समाज
यांच्यातील असंतोषामुळे सरकार काहीसे बॅकफूटवर गेल्यासारखे वाटत असले तरी
सरकारच्या कामकाजात वा धोरणात काही बदल पडला असल्याचे दिसत नाही. उलट अप्रस्तुत
मुद्दे वा नॉन-इश्यूज उकरून काढून सा-या विधीमंडळाचे, सरकारचे व जनतेचे लक्ष मुख्य
प्रश्नांपासून कसे विचलित करता येईल असे कातडीबचाऊ धोरण अवलंबिले जात आहे. यातही विशेषतः
उद्योग व शहरांचे प्रश्न, अतिक्रमणे वा नृत्यबार यासारखे, त्यातील घटकांच्या
हिताचे रक्षण करतांना (स्वतःचेही स्वार्थ साधत) ज्या पध्दतीचे निर्णय घेते आहे,
तेवढे शेती वा ग्रामीण भागातील दुरवस्थेबाबत घेत नसल्याचे दिसते आहे. त्यात परत
अंमलबजावणीचे प्रश्न आहेतच. शेतीबद्दल अलिकडेच अत्यंत कणव व्यक्त करणारे रंगकर्मी
नाना पाटेकर यांनी शासकिय कर्मचा-यांचा सातव्या वेतन आयोगावर खर्च होणारा निधी
शेतक-यांवर खर्च करण्याचा सल्ला दिला आहे. या सातव्या वेतन आयोगाला सर्व स्तरांतून
होणारा विरोध लक्षात घेता या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात काही तरतूद न करता
या आयोगाबाबत जूनपर्यंत, म्हणजे पाऊस पडेपर्यंत काही निर्णय घेतला जाणार नाही हे
सरकारला जाहीर करावे लागले आहे. अर्थात त्यावेळीही नानांना ज्या
मुख्यमंत्र्यांबद्दल ममत्व वाटते ते देवेंद्र फडणवीस त्यांचा हा सल्ला कितपत
लक्षात घेतात हे लवकरच कळणार असले तरी त्या निमित्ताने घडणा-या चर्चांतून एकंदरीत
इतर समाजाची वा शासनाची शेतक-यांची काय भावना आहे हे स्पष्ट होऊ लागले आहे.
खरं म्हणजे या प्रश्नाकडे इतके वरवर वा भावनात्मक होऊन
पहाता येणार नाही. त्यातली वैधानिकता व व्यावहारिकता तेवढीच महत्वाची आहे. घटनेत
नमूद केलेल्या समता व बंधुत्वाच्या तत्वांचा येथे सबंध येतो. राष्ट्रीय साधन
सामुग्री व संसाधनांवर सर्व नागरिकांचा असलेला समान हक्क व त्याचे न्याय्य
पध्दतीने वाटप ही सरकारची जबाबदारी सरकार किती न्याय्य पध्दतीने करते हे त्यातून
स्पष्ट होणार आहे. लोकशाहीतील अशा प्रकारचे निर्णय हे जनतेच्या लोकप्रतिनिधीनीं
विधीमंडळात मांडून करावयाचे असतात. मात्र आज विधीमंडळे ज्या पध्दतीने वा ज्या
कारणांसाठी चालवली जातात त्यात मात्र सरकारवर वर्चस्व ठेवून असलेले घटक, पक्षीय
राजकारणाचा दबाब, मतदारसंघांची सुरक्षा व सरकारातील घटकांचा प्रत्यक्ष भौतिक लाभ
अशा अलोकशाही पध्दतीनेच निर्णय होत असतात व शेतकरी नावाचा घटक या सा-या निकषांपैकी
एकही निकष पूर्ण करीत नसल्याने त्यांच्या बाजूने असे निर्णय होत नाहीत.
आताही या प्रश्नाचा विचार करतांना आपल्या नागरिकत्वाची शपथ
काय हे बघितले पाहिजे. 'भारत हा माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत',
अशी ती
शपथ आहे. आता देशातील हे सारे बांधव लोकशाहीच्या विविध स्तरावर कार्यरत असणार हे
स्वाभाविकच आहे, तेव्हा त्यांच्यातील आपसीय संबंधात बंधुभाव व सहचर्य किती व कुठे
दिसते हे तपासणेही योग्य दिसेल. प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून गावपातळीवरील शासकीय
कर्मचारी वा आपण स्वतः निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांचा या ताणतणावातील सहभाग
बघता हे अधिक स्पष्ट होईल. आमदार वा खासदार होणे याबाबतच्या ग्रामीण नेतृत्वाच्या
परंपरागत चालत आलेल्या अत्यंत चूकीच्या संकल्पना बाळगत ही मंडळी सरंजामशाहीच्या
युगातच वावरत असते. एकदा निवडून आले म्हणजे पाच वर्षे काहीही केले तरी आपल्या
स्थानाला, पदाला, अधिकाराला वा त्यातून निर्माण होणा-या स्वार्थाला कोणी हात लावू
शकत या मस्तीत आपली खरी कर्तव्ये विसरत ही सारी मंडळी राजकारणात अत्यंत
धंदेवाईकपणानी वावरू लागतात. एकतर आपले सारे कालबाह्य वा चूकीचे कायदे वा
योजनांतील तरतुदी यांच्या अमलबजावणीत या महाभागांचा कुठेनकुठे संबंध येत असल्याने
यांच्याशी वाईटपणा घेणे म्हणजे अनेक संकटांना ओढून घेण्यासारखे असते. एकदा तुम्ही
या लोकप्रतिनिधी वा प्रशासनाच्या लेखी विरोधी वा बंडखोर असल्याचे ठरताच तुम्हाला
कसे नामोहरण करायचे हे यांना सहजगत्या शक्य होते व आज ग्रामीण भागात असे अनेक
शेतकरी बांधव या कटकारस्थानाचे बळी झालेले दिसतील. ग्रामीण जीवनातील नैराश्याचे ते
एक प्रमुख कारण आहे व या सरकारी पाशातून मुक्त होण्याचे सहज मार्ग आजतरी दिसत
नाहीत.
या, सरकार म्हणजे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा नाकर्तेपणाचे
चांगले उदाहरण म्हणून ग्रामीण भागातील पिण्याच्या व शेतीच्या सिंचनाचा देता येईल.
ज्या भागातील लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसारख्या पदावर अनेकवेळा राहूनही त्यांना
इतर तर सोडा आपल्या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. मात्र या
कारणासाठी शासनाचा तर प्रचंड पैसा तर दरवर्षाच्या अर्थसंकल्पानुसार अगोदरच खर्च
झालाय. हा पैसा कुठे गेला हे कागदोपत्री सिध्द होऊनही केवळ राजकीय भाऊबंदकीतील
परतफेड म्हणून सर्वसामान्यांचे काहीही का होईना आमचे राजकारण महत्वाचे या
नेहमीच्याच पायंड्याने त्याची साधी चौकशी केल्याचे टाळले जात आहे, मग कारवाई तर
दूरच. या सा-या प्रकारात ज्यांच्या चौकशीची काही एक गरज नाही, अशा अनेक प्रशासकीय
चूका आहेत, त्यांच्याबाबत एकाही प्रशासकीय अधिका-यावर कारवाई झालेली नाही. हा
प्रश्न आता सत्ताधारी व विरोधक असा राहिलेला नसून सारी राजकीय व्यवस्थाच यात
अडकलेली असल्याने आज गंभीर झालेल्या शेतकरी वा ग्रामीण प्रश्नांबाबत काहीही केले
जात नाही.
असे हे सारे चित्र असतांना एकीकडे गावात होरपळणारा शेतकरी व
त्याचवेळी आपल्या स्वार्थाची कटाक्षाने काळजी घेणारे प्रशासन व लोकप्रतिनिधी
यांच्यातील ताणतणावात शेवटी मालक हरतो व सेवेकरी जिंकतो अशी विदारक परिस्थिती
खुद्द मालकासाठीच निर्माण झालेल्या लोकशाहीत झालेली दिसते.
डॉ. गिरधर पाटील 9422263689.