आजची राजकीय भीषणता...
गेल्या काही शतकात भारतीय राजकारणाचे
बदलते स्वरूप बघता आजची सरकारे म्हणायला लोकशाही मार्गाने निवडून आल्याचे दिसत असले
तरी या बदलत्या राजकारणाचा गेल्या काही वर्षांतील कारभार बघता भारतीय लोकशाहीच्या
भवितव्याविषयी चिंता निर्माण करणारे आहे. या राजकीय परिस्थितीला पक्षीय
राजकारणाच्या दृष्टीकोनातून बघणे हा एक अनिष्ठ व घातक चाळा भारतीय माध्यमांना व
जनमानसाला लागला असून एकदा त्यात फसले की हा चांगला की तो या वाग्युध्दातून काही
निर्णायक हाती न लागता सतत युध्दजन्य परिस्थिती कायम ठेवण्यात या सा-यांना यश आले
आहे. आज देशातील विधायक विचारवंत व हितचिंतक यांचे प्रमाण मुळीच घटलेले नाही,
मात्र त्यांचा या व्यवस्थेतीत वाव नगण्य ठरत आपल्या आजच्या सा-या प्राथमिकता केवळ
सरकार, सत्ता व राजकारण या भोवती फिरत असल्याने या देशातील सा-या जनतेचा कार्यक्रम
हा एकाद्या पक्षाने प्रायोजित केल्यासारखा व देशाचे सारे विचारविश्व सत्ताकारणाशी
निगडीत असल्याचे भासवले जात आहे.
आजच्या राजकारणाचे वास्तव बघू जाता एकाच मानसिकता व वृत्तीचे घटक मिळून तयार
झालेले सारे पक्ष आघाडीवर असल्याचे दिसते. सा-या पक्षांची ध्येयधोरणे ही वेगवेगळी
असल्याचे भासवले जात असले (काही अपवाद सोडून) तरी सारी राजकीय आखणी मात्र प्रामुख्याने
सत्ताकारणाशी जुळलेली दिसून येते. पक्षीय कार्यकर्ता ज्याला जिथे वाव व जागा मिळेल
तेथे तो आपल्या कारवायांना सुरुवात करतो. प्रसंगी वेळ आली तर सत्ताकारणाला आवश्यक
असणारे पक्षीय अभिनिवेष व आवरणही तो बदलायला तयार असतो. असे या पक्षांतराचे प्रमाण
निवडणुकांच्या अवतीभोवती वाढते असते. आपल्या तत्वनिष्ठतेपेक्षा पक्षीय राजकारणातील
लाभ हे यामागचे प्रमुख कारण असते. यातला प्रत्येक घटक हा आपल्या स्वार्थाची
निश्चिती करत पक्ष उभारत असतो व ही उभारणी ग्रामपंचायत ते देश या
चढत्याभाजणीपर्यंत जात सारी राजकीय व्यवस्था यातून निर्माण झाल्याचे दिसते.
या अरिष्टाचे खरे कारण देशाच्या
राजकारणात शिरलेल्या काही अनिष्ट प्रवृत्तींशी संबंधीत आहे. या अनिष्टपणाचा संबंध
परत पक्षीय राजकारणाशी जोडायला गेले तर बदल वा परिवर्तन म्हणजे पक्षीय बदल या
निष्कर्षाला येत त्यातून काही दिलासा मिळतो का याचा प्रयत्न होतो. तसे प्रयोगही
भारतीय मतदारांनी आजवर केलेले आहेत. आजवर सा-या तत्व वा विचारप्रणालींना मानणा-या
पक्षांना भारतीय राजकारणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या आपापल्या भूमिका
बजावण्याची संधी मिळाली आहे. या प्रयोगातून भारतीय राजकारणात फारसे सकारात्मक बदल
हे पक्ष करू शकले असे दिसत नाही. मुळातच या सा-या बदललेल्या परिप्रेक्षात एकाद्या
पक्षाला देशाच्या धोरणात्मक बाबी मग त्या आर्थिक असोत वा परराष्ट्र , संरक्षण या
क्षेत्रातील असोत, राजकीय पक्षांना यात फारसे करायला वाव आहे, अशी परिस्थिती
राहिलेली नाही.
या अर्थवादी कालखंडात सा-या सरकारांवर बाजार व्यवस्थेचे एक अप्रत्यक्ष
नियंत्रण येत असून सरकारांच्या निर्णयक्षमतांवर त्यामुळे मर्यादा येत आहेत. एकतर
जागतिक वा वैश्वीकीकरणामुळे भारताला आता जागतिक व्यवस्थेचा एक भाग म्हणून वावरावे
लागते व त्यातून केलेल्या करारांचे पालन करत एक देश म्हणून भूमिका बजवावी लागते.
म्हणजे तुमची आर्थिक धोरणे ही कुणा एकाद्या पक्षाच्या हाती न रहाता जागतिक बँक,
जागतिक नाणेनिधी, जागतिक व्यापार संस्था वा जगात आर्थिक सत्ता म्हणून वावरणा-या तेलसत्तांसारख्या
आस्थापनाकडे जातात. परराष्ट्र व संरक्षण विषयक धोरणेही कुणा एकाद्या पक्षाच्या
हाती राहिलेली नाहीत. ती एकतर युनो वा जागतिक संरक्षण समीकरणांशी जुळलेली असतात. म्हणजे
अपेक्षित बदल हा पक्षीय परिक्षेत्राच्या परिघाबाहेरचा असून पक्षाच्या
ध्येयधोरणांपेक्षा राजकीय चारित्र्य व वृत्ती यांचा आहे. राजकारणातील विधायकता, प्रामाणिकता
व पारदर्शकता पुनर्प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राजकीय व्यवस्थेची आखणी
करण्याचे प्रयत्न करावे लागतील.
आजच्या राजकारणावरची पक्षीय पकड लक्षात घेता कुठलाही बदल हा अशक्यप्राय वाटतो.
या देशात आता काही होणारच नाही अशी धारणाही होत जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे
माध्यमांचा प्रभाव व त्यांच्यातून निर्माण होणारे भ्रामक चित्र. काही अपवाद वगळता
सारी माध्यमे अप्रत्यक्षरित्या सरकारचे बलाढ्यीकरण व सामान्यांचे क्षुद्रीकरण करीत
असतात. त्यातून प्रयत्नवाद्यांचे खच्चीकरणच होत असते. नेमकी अशी परिस्थिती इंदिरा
गांधी सरकारच्या राजवटीत झाली होती. इंदिरा गांधीची त्यावेळची राजकारणावरची पकड ही
देशात दुसरे काही होऊ देणार आहे की नाही असे वाटण्यासारखीच होती. मात्र अशा या
धोरणी व धाडशी नेत्यानेही काही ऐतिहासिक चूका केल्या व प्रत्यक्ष जनमानसात काय
चालले आहे हे अधोरेखित करू न शकलेल्या माध्यमांनाही हुलकावणी देत राजनारायण
सारख्या क्षुल्लक उमेदवाराकडून त्यांना हार पत्करावी लागली. नंतर काय काय घडले
याचा इतिहासही सा-यांना अवगतच आहे. या सा-या परिवर्तनामागे पक्षीय राजकारणाचीच
पार्श्वभूमी असल्याने या पक्षाऐवजी तो पक्ष अशी मांडणी झाल्याने त्या प्रयोगातून
फारसे हाती लागू शकले नाही.
याही वेळेला तेच नाट्य पार पडले व या सा-या अधोगतीला एक पक्ष कारणीभूत
असल्याची मांडणी करण्यात आली व त्या पक्षाऐवजी दुसरा तुल्यबळ पक्ष निवडून दिल्यास
बदल शक्य होतील या आशेने परत एकदा पक्षीय बदल करत नवे सरकार सत्तेवर आणले. मात्र
यात मी मांडत असलेला राजकीय चारित्र्य व वृत्ती याचा विचार न झाल्याने राजकारणातील
तीच मानसिकता परत सक्रीय झाल्याने सर्वसामान्य जनतेचा परत एकदा भ्रमनिरास झाला
आहे. आता याही सरकारचा आविर्भाव इंदिरा सरकारच्याच वाटेने जात असल्याचे दिसते आहे.
जनतेने यांना त्यांच्या गुणवैशिष्ठ्यांतून निवडून दिले नसून केवळ काँग्रेसच्या अक्षम्य
राजकीय चूका व त्याचा यांनी उठवलेला नैमित्तीक लाभ यातून मिळालेल्या यशाची हवा यांना
काही ऐतिहासिक चूका करायला भाग पाडील. नाहीतरी शेती-शेतकरी व नाहीरे वर्गाकडे होत
असणारे अक्षम्य दूर्लक्ष व धर्मवादाचा फालतू
अवडंबर ही या चुकांची नांदी आहे व माध्यमांतून कितीही भ्रामक चित्र रंगवले
तरी सामान्यांतील वाढत्या असंतोषाकडे शहामृगी पवित्र्याने पाहिल्यास नियतीच्या
मदतीने येणारा काळच आपल्या सा-यांची या अरिष्टातून सुटका करील हा एकमेव आशावाद
आपल्यासाठी उरला आहे.
डॉ. गिरधर पाटील ९४२२२६३६८९