बदलती शेती.. बदलते प्रश्न...
अगदी महात्मा फुल्यांपासून ते शरद
जोशींपर्यंत सा-यांनी शेती व शेतक-यांच्या प्रश्नांची अचूक, बिनतोड व सखोल मांडणी
केली तरी शेती व शेतक-यांचे प्रश्न दिवसेंदिवस अधिकच क्लिष्ट व गंभीर होत
चालल्याचे दिसते आहे. बदलत्या समाज, अर्थ व राजकारणामुळे सारे मानवी जीवनच
स्थित्यंतरातून जात असतांना शेतीही या बदलत्या वातावरणाला सामोरे जात बदलतांना
दिसते आहे. एक मात्र नोंदता येईल की शेती साक्षरता व शेतक-यांचे प्रबोधन यामुळे प्रश्न
निर्माण होण्याची व न सुटण्याची कारणे तशी स्पष्ट होऊनही शेतक-यांनी नेमके काय
केले म्हणजे त्यांनाही इतर समाज बांधवाप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता येईल याचा
मात्र प्रयत्न धोरणात्मक, सामूहिक व व्यापक स्तरावर फारसा झाल्याचे दिसत नाही.
जातीधर्म व पारंपारिक व्यवस्थेत स्थिरावलेल्या शेतक-यांची संघटना बांधणे केवळ कठीणच
नाही तर अशक्य आहे अशा पार्श्वभूमीवर उदयास आलेल्या संघटनांची ताकद कमी होती असेही
नाही, देशभरात निरनिराळ्या विचारधारांनी प्रेरित अनेक गट व संघटना आपापल्या परिने
कार्यरत असलेल्या आजही दिसून येतात मात्र या सा-यांचा एकात्मिक व निर्णायक परिणाम
झालेला दिसत नाही. शेतक-यांच्या उद्रेकातून टोकावर आलेल्या समस्यांची तात्पुरती
मलमपट्टी करत असंतोषाचे दमन करण्यात आजची व्यवस्था यशस्वी झाल्याचे वरवर दिसत असले
तरी या असंतोषाचा स्फोट झाल्यावर काय होईल हे सांगता येत नाही.
आज शेती ही ग्लोबल होत उत्पादन,
व्यापार, प्रक्रिया, तंत्रज्ञान व संशोधन या सा-या आघाड्यांवर विकसित होतांना
दिसते आहे. विकसित राष्ट्रातील शेती व मागास राष्ट्रांची शेती यात पडत जाणारी
तफावत त्या त्या राष्ट्रांतील शेतक-यांना मिळणारी संरक्षणे व शेती वाचवण्याची
धोरणे यांच्याशी निगडीत असते. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतासारख्या वसाहती
यांनी सुरवातीच्या काळात मिश्र अर्थव्यवस्था स्विकारली असली तरी शेतीच्या बाबतीत
ही व्यवस्था सरकारी हस्तक्षेपाची कडेकोट बंदिस्त व्यवस्थाच होती. समाजवादी
धोरणांची पुरेशी शिक्षा भोगल्यानंतर जागतिकीकरणानंतर भारतात सा-यांनाच त्याचे सुपरिणाम
भोगावयास मिळतील अशा आशा पल्लवित झाल्या असतांनाच केवळ औद्योगिक व सेवा क्षेत्रे
विकसित होत शेतीत मात्र आजही खुलेपणाचा अभाव जाणवतो आहे. बाहेरच्या बदलांचा रेटा व
स्थानिक स्वार्थ यांच्यात सापडलेला शेतकरी मात्र भारतातीत वंचित घटकांपैकी या
विषमतेचा बळी ठरला आहे.
आपल्या समस्या सोडवण्याच्या पध्दतीही
ठोकळेबाजपणाच्या होत गेल्या आहेत. या प्रयत्नांच्या या व्यवस्थेतील मर्यादा मात्र
आपण लक्षात घेत नाही. सा-या शेतकरी आंदोलनांवर स्वातंत्र्यकाळातील परकीय इंग्रजांशी भांडत वा
निषेध प्रकट करणा-या आंदोलनांची छाप पडलेली दिसते. लोकशाहीत आपल्या प्रश्नांची तड
लावून घेण्याच्या सनदशीर मार्गांचा यात अभाव दिसतो. शेतकरी आंदोलनात सारे शेतकरी
एकत्र येत सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारतात मात्र त्याच भागातून निवडून आलेले
आमदार वा खासदार यासारखे लोकप्रतिनिधी या सा-या प्रक्रियेपासून जरा दूरच रहात
असल्याचे दिसते. जणू ती आपली जबाबदारी नाही हा अविर्भाव दिसत असतांनाही शेतकरी
मात्र त्यांना वगळत आपली आंदोलने पार पाडत असल्याचे दिसते. खरे म्हणजे धोरणात्मक
निर्णयाची योग्य व परिणामकारक जागा जी विधिमंडळ वा संसद असू शकते तेथे मात्र
शेतक-यांच्या प्रश्नांवर ज्या टोकाची चर्चा व्हायला हवी ती न झाल्याने सारे प्रश्न
अधिक गंभीर व क्लिष्ट होत चालले आहेत. ख-या लोकशाहीत आपल्या मतदार नागरिकांचे सारे
प्रश्न योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळेला मांडणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे
वैधानिक कर्तव्य व जबाबदारी असते व ती पार पाडण्यास जनतेनेच त्याला बाध्य केले
पाहिजे.
याउलट समाजातील काही घटक आपले या व्यवस्थेतील स्थान अधोरेखित करीत आपल्या
लहानमोठ्या मागण्या सहजगत्या मिळवत असल्याचे दिसते. लोकप्रतिनिधींच्या आधारापलिकडे
जात स्वतःच्या दबाब यंत्रणा निर्माण करण्यात हे घटक यशस्वी झाल्याचे दिसते. काही
घटकांना त्यांच्या वर्गीय स्वरुपातून आपोआप मिळणारे फायदे हे त्याचे उदाहरण.
संघटित नोकरशाही एक मतदारशक्ती म्हणून वावरत असल्याने त्यांच्या प्रश्नाकडे तसे
दूर्लक्ष होत नाही म्हणूनच मागणी असो वा नसो ठराविक काळात त्यांच्या पगारवाढीची वेतन
आयोगासारखी वैधानिक यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसते. हाच प्रकार कामगारांच्या
बाबतीतही होतो. अलिकडे उदयास आलेला शहरी मध्यमवर्ग आता अशा लाभक्षेत्रात आलेला
दिसतो. साध्या वैद्यकिय प्रवेशावरून सर्वौच्च न्यायालयाच्या निकालावर केंद्र व
राज्य सरकार ज्या धडाडीने कामाला लागले तशी तत्परता कधी शेतीच्या प्रश्नात दिसून
आली नाही. शेतीच्या सा-या प्रश्नांच्याबाबतीत वेळेवर निर्णय कधीच घेतले जात नाहीत.
त्याचा शेतक-यांना फायदा होईलच असे दिसत नाही. शेतक-यांच्या बाबतीत ज्याही घोषणा
होतात त्या संबंधित खात्याकडे वेळेवर न पोहचल्याने शेतक-यांना त्यांचा काडीमात्र
फायदा होत नाही मात्र सरकार या घोषणांचे भांडवल करत आपला राजकीय स्वार्थ साधत
रहाते.
अलिकडे कॉर्पोरेट क्षेत्राने आपली सारी सरकारे ताब्यात घेतल्याचे दिसते. सारे
निर्णय विनासायास आपल्या बाजूने लावून घेण्याचे कसब त्यांनी हस्तगत केल्याचे
दिसते. आम्ही तुम्हाला सत्तेत आणतो मात्र नंतर तुम्ही आमचे ते ऐकले पाहिजे असा
अलिखित करार यांच्यात झाल्याने लोकप्रतिनिधी असो वा नसो यांची कामे बिनबोभाट होत
असतात. सरकारकडून कामे करून घेण्याच्या या सा-या पध्दतींमध्ये शेतकरी कुठेच दिसत
नसल्याने सरकार दरबारी त्याच्या हिताचे निर्णय व्हायची शक्यता नाही. गावोगावच्या
मतांच्या राजकीय दलालांच्या प्रभावामुळे एक मतदार शक्ती म्हणून शेतकरी गणला जात
नाही. त्याची मते सहज हाकारता येतात याचा राजकारण्यांना आत्मविश्वास असतो. खुद्द
शेतकरीच स्वतःला एक स्वतंत्र वर्ग व त्याच्या उद्योगाच्या स्वतंत्र मागण्या आहेत
असे मानत नाही. शेतक-यांच्या मागण्यात कधी
एकवाक्यता दिसली आहे असे दिसत नाही. कोसागणित भाषा बदलते तशा शेतक-यांच्या मागण्या
बदलत रहातात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे सा-या शेतकरी समाजात एकवाक्यता व
संघटितपणा नसल्याने लोकशाहीत त्यांच्याकडे लक्ष जावे असे काहीही होत नाही. ज्या
दिवशी शेतकरी एक होत एका सूरात बोलू व वागू लागेल त्या दिवशी त्याच्या प्रश्नांना
ही व्यवस्था हात लावील अन्यथा शेतकरी व त्यांच्या मागण्या यांची टोलवाटोलवी अशीच
चालू राहील हे मात्र नक्की.
डॉ. गिरधर पाटील 9422263689