शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

नव्या आंदोलनाचे तंत्र....



                      नव्या आंदोलनाचे तंत्र....
मागच्या लेखात लोकशाही व्यवस्थेत संघटितपणाचे काय महत्व आहे हे आपण जाणून घेतले. मुळात संघटित होणे हेच मुळी लोकशाहीतले मुख्य आंदोलन असते. एका हेतुने वा ध्येयाने प्रेरित होऊन संघटित होणारी जनता ही त्याहून परिणामकारक. कारण ही व्यवस्था नेहमी आकड्यांना घाबरत असते व आपली सत्तेची घडी बिघडू नये म्हणून कायम सतर्क असते. आपल्या दृष्टिने सुरक्षिततेची गोष्ट म्हणजे अजून तरी संघटित होणे हे बेकायदेशीर ठरवलेले नाही. आजवर अवलंबलेली सारी आंदोलने ही रस्तारोको, घेराव, धरणे, ज्यातून सरकारला आपोआपच कायदेशीर कारवाई करण्याचे हत्यारच आपण सोपवत असतो व त्या हत्याराचा गैरवापर करत लाठ्याकाठ्यांचा मार व सरकार खोटीनाटी कलमे लावून खोटे खटले दाखल करत सारे आंदोलनच खच्ची करीत असते. स्वतःवरील अन्यायनिवारणार्थ केलेल्या अशा आंदोलनात दाखल केलेले खोटे खटले काढून टाकण्याची मिनतवारी करण्याचे कामही शेतकरी नेत्यांवर येत असल्याने राजकीय सौदेबाजीत शेतक-यांचे प्रश्न तसेच रहात केवळ काहीतरी केल्याचे समाधान बाळगत आहे ती परिस्थिती स्वीकारावी लागत असते. शिवाय शेतक-यांच्या सा-या ख-या प्रश्नांना एकदा पक्षीय राजकारणाची झूल चढवली की ते आंदोलन शेतक-यांचे न रहाता विरोधी पक्षाचे म्हणून सत्ताधा-यांना सहजगत्या बाजूला सारता येत असते. त्यामुळे मोठ्या प्रयासाने उद्युक्त केलेली आंदोलनकर्त्यांची फळी नेस्तनाबूत होत पुढच्या आंदोलनात सामील व्हायला कोणीच तयार नाही अशी परिस्थिती आली आहे. आता अशा प्रकारच्या आंदोलनाचे नाव काढताच शेतक-यांच्या अंगावर काटे उभे रहातात व कोणीही आंदोलनात यायला तयार नसतो त्याचे खरे कारण हे आहे.
त्यामुळे आपले प्रश्न सोडवण्याची प्रथम पायरी म्हणजे निदान गाव पातळीवर पाचपंचवीस समविचारी तरूणांनी केवळ एकत्र यायला काही हरकत नसावी. त्यानी काय होणार अशा शंका येणं स्वाभाविक आहे. मात्र सुरवातीला थोडा संयम बाळगत सारी संकल्पना समजून थोडाफार विश्वास ठेवणे आवश्यक आहे. शेतकरी चळवळीतला प्रदिर्घ अनुभव, त्यात झालेल्या चूका, राबवलेल्या व यशस्वी झालेल्या काही संकल्पना याची शिदोरी घेत आपल्यावर कुठलीही जोखीम न येऊ देता एका नव्या आंदोलनाचे तंत्र विकसित करून त्याचा वापर येत्या काळात केल्यास या तंत्राचे जे काही यशस्वी परिणाम हाती लागले आहेत त्याचा व्यापक स्तरावर उपयोग करण्याची संधी आपणासर्वांना घ्यावी लागणार आहे.
मानसशास्त्रात सिध्द झालेली एक संकल्पना आहे. वर्तन व विचार याचा परस्पर संबंध कधीच सिध्द झालाय व त्याचा प्रत्यक्षातला वापरही शक्य झाला आहे. एकादा विचार तुम्ही जेवढ्या प्रखरतेने मनात घोळवाल तेवढा तो प्रत्यक्षात यायची शक्यता वाढते. आणि यात सामूहिकता असेल तर या प्रक्रियेचा वेग कित्येक पटीत वाढत असतो. कुठल्याही कृतीमागे एक विचार असतो व अशा विचारांनीच प्रत्यक्षात कृतीही होत असते. आंदोलनाचा विचार हा जेवढा प्रबळ तेवढी कृती परिणामकारक असते. हा विचार न्याय्य, तार्किक, व्यापक हिताचा व वास्तवदर्शी असावा म्हणजे प्रत्यक्षात यायला वेळ लागत नाही. व कृतीही आंदोलनकर्त्यांना अडचणीत आणणारी नसावी. आज आपल्या सा-या मागण्या हे सारे निकष पूर्ण करणा-या आहेत व केवळ त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर मांडण्याची आपली तयारी व क्षमता असली पाहिजे. सुदैवाने तुमची लढाई ज्या व्यवस्थेशी आहे ती सारी मंडळी सत्तापिपासू, स्वतःच्या स्वार्थाने लडबडलेली, कुठलेही नैतिक अधिष्ठान नसलेली आहे. त्यामुळे शिस्तबध्द पध्दतीने गेल्यास ही लढाई जिंकणे काहीच अशक्य नाही.   
याचाच अर्थ आपल्याला अगोदर या आंदोलनामागचा विचार निश्चित करावा लागेल. शेतीच्या परावलंबितेतील निसर्गाचा एक भाग सोडता सारी अगतिकता ही मानवनिर्मित व्यवस्थेत आहे व ती घालवता येऊ शकते हे आपण अगोदर ओळखले पाहिजे. कुठलीही समस्या सोडवण्याअगोदर ती नेमकी समजून घेतली पाहिजे असे एक प्रसिध्द इंग्रजी वचन आहे. त्यामुळे आपला हा सारा अभ्यास परिस्थितीच्या आकलनाशी जोडता आला तर हे सारे कोडे समजून घेतांनाच त्याच्या सुटण्याचे मार्गही दिसू लागतील. शेवटी विचारमंथन ही एक अशी प्रक्रिया आहे की तिच्यातूनच अमृताचे सार निघण्याची शक्यता असते. आजची शेती ही शेतक-यापुरती मर्यादित न रहाता तिची अनेक अंगे सामाजिक, राजकीय, आर्थिक परिप्रेक्ष्यात येत असून त्यांचा नेमका संदर्भ आपल्याला या बदलत्या वातावरणात सातत्याने घेत रहाणे महत्वाचे ठरणार आहे. आपली आजची परिस्थिती, ती किती गंभीर आहे हे आपण जाणतो. ती कां आली ? कशी आली ? त्यात आपला नेमका सहभाग काय ? आपण तिला कितपत जबाबदार आहोत ? आताही तिच्यात जर काही बदल घडवून आणायचे असतील तर आपण नेमके काय केले पाहिजे ?, ही आपल्या विचाराची दिशा असावी व एक शेतकरी म्हणून सा-यांनी या विषयावर अभ्यास व विचारमंथन करावे. विद्यापीठातल्या विद्वानापेक्षा कधीतरी बांधावरचा शेतकरी फार मोलाची गोष्ट बोलून जातो हा माझा अनुभव आहे. कारण परिस्थितीने शिकवलेला धडा हा वास्तव व सरळ सरळ समस्येशी निगडीत असल्याने या सा-या प्रक्रियेत बांधावरचा शेतकरी दिसावा हीही एक अपेक्षा आहे.
या नव्या आंदोलनाची काही मूलभूत सूत्रे आहेत ती अशी. या आंदोलनात सामील होतांना मी केवळ शेतकरी आहे म्हणूनच या आंदोलनात येत आहे. माझे इतर कुठलेही स्वार्थ व अपेक्षा बाहेर ठेवत केवळ शेती व शेतकरी हिताला प्राधान्य देईन. आंदोलनाची विभागणी होईल अशा कुठल्याही जातीधर्माच्या भेदाभेदाला वाव देणार नाही अशा विचारानेच या आंदोलनात यायचे आहे. दुसरी महत्वाची बाब कटाक्षाने पाळावी लागेल ती पक्षीय राजकारणाची. आंदोलनाला सर्वात मोठा धोका असतो तो पक्षीय राजकारणाचा. पक्षाभिनिवेष बाजूला ठेऊनच या आंदोलनात यावे लागणार आहे. जर काही अपरिहार्य कारणांनी पक्षीय राजकारण सोडता येत नसेल तर शेतीधर्माला जागून निदान या आंदोलनाला इजा पोचणार नाही वा गालबोट लागेल असे काही करू नये, कारण शेती व शेतकरी वाचला तरच तुमच्या राजकारणाला काही अर्थ रहाणार आहे.
आज शेतक-यांची तरूण पिढी नेमकी अशा कोंडीत सापडली आहे, काही तरी व्हावे, काहीतरी करावे असे प्रकर्षाने वाटत असते. मात्र नेमके काय करावे हे न उमगल्याने काहीच होणार नाही का या निराशेनेही ग्रासते. मी माझ्या अनुभवावरून सांगतो या दिशेने जाणा-या अशा अनेक साध्यासोप्या गोष्टी आहेत की आपल्याला आपले इप्सित व ध्येय गाठणे काहीच अशक्य नाही, हवा तेवढा गाढ विश्वास व दृढ निर्धार !!
                                                             डॉ. गिरधर पाटील 9422263689

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा