शेतकरी तितुका मेळवावा......
आपल्याकडे दर बारा कोसावर भाषा बदलते
असे म्हणतात. तसंच शेतीच्या बाबतीतही म्हणता येईल. अगदी कोसावर नसली तरी एकंदरीत
आपली भौगोलिक वैविध्ये लक्षात घेता कोकण, पश्चिम, दक्षिण, उत्तर महाराष्ट्र,
मराठवाडा व विदर्भ हे सारे प्रदेश शेतीच्या वेगळ्यापणानी ओळखता येतात. यातही परत
बागायती, कोरडवाहू या सिंचनाच्या निकषांवर वा त्यामुळेच की काय विविध पिकपध्दतींनी
या भागांची वैशिष्ठ्ये जोपासली आहेत. अशा बहुपेडी शेतीत असणारा शेतकरी एकसारखा कसा
असेल ? शेतीतल्या वैविध्याबरोबर तो विविध
जातीधर्म, सामाजिक रुढी, परंपरा, आर्थिक विषमता या समांतर कप्प्यातही विभागला गेला
आहे. असा शेतकरी एक नसला तरी या सा-या
शेतीचे प्रश्न मात्र राज्यातच नव्हे तर देशात सारखेच दिसतात. शेती ही कशीही
वा कितीही पिकवली तरी शेतमालाला
उत्पादनखर्चही भरून निघणारा भाव मिळत नसल्याने शेती ही तोट्याची, म्हणून शेतकरी
कर्जबाजारी व त्यामुळे होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या ही समान परिस्थिती या
वैविध्यपूर्ण शेतीक्षेत्रात दिसते. केवळ कर्जच पिकवणारी शेती ही वस्तुस्थिती
सर्वसमावेशक दिसते. स्थळकाळानुसार काही भागातील या हलाखीचे प्रमाण कमी जास्त असू शकेल
परंतु एकंदरीतच या क्षेत्राची परिस्थिती गंभीर झाल्याचे अनुमान नाकारता येत नाही.
अशा या बहुपेडी शेतीच्या समस्याही तशा
वेगवेगळ्या व त्यानुसार तिथल्या शेतक-यांच्या मागण्याही वेगवेगळ्या असण्याची
शक्यता आहे. त्यातील प्राधान्यक्रमही वेगवेगळा असू शकतो. अशा विविध पातळ्यांवर
असलेल्या या शेतकरी समाजाला एका समान कार्यक्रमावर एकत्र आणणे ही खरी कसोटी असून
एक समान मागण्या व प्राधान्याचा कार्यक्रम आखणे महत्वाचे आहे. यात मुख्यत्वे
शेतीतील हलाखीची कारणे व त्यावरच्या उपाय योजना यांचाही सर्वंकष अभ्यास करून
सोडवण्याच्या दृष्टीने काय सामाईक कार्यक्रम हाती घेता येईल याचा विचार करता येईल.
यात शेतक-यांच्या बाजूने उभा राहिलेला संख्यात्मक जनमताचा रेटा महत्वाचा ठरणार
असून व्यापक स्वरूपाचा उठाव झाल्याखेरीज अपेक्षित परिणाम दिसणार नाहीत. तेव्हा
शेतक-यांचे एक सर्वसमावेशक परिणामकारक आंदोलन उभे रहाणे ही काळाची गरज ठरली आहे.
अशा या विविध स्तरांवरच्या शेतक-यांना एका समान
धाग्याने संघटित करायचे असेल तर आज शेती ज्या वातावरणात मरणासन्न अवस्थेला आली आहे
त्याची मूलभूत कारणे शोधावी लागतील. आपल्या शेतीतले प्रश्न हे दिसतात तसे वरवर न
पहाता आपल्या राजकिय, आर्थिक वा सामाजिक व्यवस्थेत नेमके असे काय दडले आहे की आपण
आज आज आत्महत्येच्या विळख्यात सापडलो आहोत हे शोधावे लागेल.आजाराचे मूळ सापडले
म्हणजे ताप वा बारीक फोडांची काळजी नसते व या मुळावरच घाव घालणारे औषध सापडले तर
वरवरच्या मलमपट्यांचीही गरज नसते. हा शेतीचा आजार व्यक्तीगत पातळीवरचा नसून या
साथीचा बळी सारा शेतकरी समाज ठरतो आहे. साथीच्या आजारात सर्वांना लागू पडणारे एकच
गुणकारी औषध वापरण्याची पध्दत असते. तसाच काही तोडगा शोधणे आज आपल्याला आवश्यक
ठरते आहे.
लोकशाहीत सारे नागरिक समान असतात व हे
समान अधिकार त्यांना घटनेद्वारा प्राप्त झालेले असतात. ही समानता देशातील
संपन्नता, सन्मान, सुखदुःख, नफानुकसान, उपजिविका यातील उचित सहभागाबरोबर जगण्याचा
समान अधिकार यात सामावलेली असते. यात भेदाभेद करता येत नाही व केला तर घटनाविरोधी
ठरतो. या घटनादत्त अधिकारांच्या पार्श्वभूमीवर सा-या शेतक-यांविषयी आपल्या
व्यवस्थेची मते व धोरणे काय आहेत याचा अभ्यास सा-या शेतकरी समाजाला एका समान
पातळीवर आणू शकतो व तोच आपल्या संघटनेचा मूळ विचार समजायला हरकत नाही. या
देशातल्या शेतक-यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगण्याचा
अधिकार आहे हे जर मान्य केले तर त्यांच्या वाट्याचे हे सुखी व समाधानाचे जीवन कोणी
व कसे हिरावून घेतले आहे हे आपल्या लक्षात येईल. आज शेतीबाबतची सारी परिमाणे बदलली
असून या देवाणघेवाणीच्या न्याय्य अर्थवादी जगात एक उद्योग म्हणून आपल्या पायावर
उभे रहातांना शेतीला या जाचक बंधनांमुळे आपल्या अस्तित्वाचीच काळजी करावी लागणे हे
सा-या शेतकरी समाजापुढे एक गंभीर आव्हान आहे व त्यापुढे जातीधर्माच्या,
पक्षापक्षांच्या व आपसातील हेव्यादाव्यांचा आपल्यावरील परिणाम बाजूला सारत
लोकशाहीला अपेक्षित एक नवा समाज उभारावा लागेल.
आजवरचा शेतकरी चळवळीतला अनुभव लक्षात
घेता हे सारे आव्हान दिसते तवढे सोपे नाही याची आम्हाला कल्पना आहे. विशेषतः
गावपातळीवरील एकंदरीत राजकीय, सामाजिक व आर्थिक व्यवस्था परोकोटीच्या अधोगतीला
पोहचली असून आता काहीच होणे शक्य नाही अशा निराशावादी वातावरणात सारा शेतकरी समाज
जीवन कंठतो आहे. सामाजिक रिती, परंपरांचा पगडा, राजकीय दहशत, आर्थिक कोंडी यांनी
पुरा वेढलेला हा समाज स्वबळावर काही करू शकेल याच्याही शक्यता फारशा दिसत नाहीत.
आजवरच्या सा-या प्रयत्नांची फलश्रुती ही राजकीय फसवणुकीचीच ठरत आल्याने असं काही
नवीन सांगणा-यावर शेतकरी समजाचा फारसा विश्वासही राहिला नाही. मात्र मानवी
प्रगतीचा इतिहास असे सांगतो की याहीपेक्षा गंभीर संकटावर मात करणारी व्यवस्था
शेवटी हलाखी भोगणा-या समाजातूनच निर्माण होते व या मूलभूत उर्मी व उर्जेमुळेच हा
मानवी समाज या व्यवस्थेला पोहचला आहे.
आज या समाजात या पार्श्वभूमीवर काहीतरी
सकारात्मक घडावे असे वाटणारे अनेक सूज्ञ शेतकरी वेगवेगळ्या त-हेने व्यक्त होत
आहेत. त्यात काही राजकीच वा आर्थिक स्वार्थ नसल्याचेही प्रकर्षाने जाणवते आहे.
म्हणजे ही भावना या क्षुद्र स्वार्थापलिकडे जात एका मानवी मूल्याशी जोडत सा-या
समाजाविषयची काळजी व्यक्त करणारी आहे. विशेषतः या समाजातला तरूण वर्ग फार अस्वस्थ
आहे. गावातील महिला आजवर आपण गृहित धरत नव्हतो परंतु ही एक फार मोठी शक्ती आपण
दुर्लक्ष करीत आहोत. आज अगदी दूर्गम भागातील खेड्यापाड्यातून सारा शेतकरी वर्ग
ज्या कळकळीने संपर्क साधून काही तरी करा हो असा टाहो फोडतो आहे. यातला साधा प्रयत्न
व पहिली पायरी म्हणजे गावातील अशा समविचारी अनुभवी, तरूण, महिला जर एकत्र येऊ
शकल्या तर प्रत्यक्ष कृती कार्यक्रम ठरवत आपणा सर्वांना एका नव्या प्रयत्नाची
सुरुवात करता येईल. काम जर खरोखरच तळमळीचे व प्रामाणिक दिसले तर पाठिंबा देण्यात
शेतकरी समाज कधीही मागे रहाणार नाही याची खात्री असल्यानेच ‘शेतकरी
तितुका मेळवावा, शेती धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे,
पुढे आणिक मिळवावे, बळीराज्य करावे जिकडे तिकडे’ ही उक्ती
सार्थ करावी लागेल.
डॉ. गिरधर पाटील 9422263689
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा