शेतक-यांनो, व्यवस्था समजून घ्या !!
लोकशाहीत आंदोलन हे आपल्या मागण्या मान्य करून
घेण्याचे एक महत्वाचे हत्यार आहे परंतु ते परिणामकारकरित्या वापरता आले पाहिजे हे
आपण मागच्या लेखात बघितले. या आंदोलनामागचा विचार, अभ्यास व संघटनात्मक बाजूही
तेवढ्याच महत्वाच्या असतात. आंदोलनाचा विचार हा आपल्या अभ्यासाचा परिपाक असतो. या
लोकशाहीच्या संदर्भात आपण नेमके कोण आहोत ? कुठे आहोत ? ही व्यवस्था आपल्याला कशी वागवते ? आपण या व्यवस्थेत कसे वागायला हवे वा आपण या व्यवस्थेला कसे
वागवायला हवे ? याचा सांगोपांग अभ्यास हा आंदोलनाच्या विचाराला व कृतीला बळकटी
आणत असतो.
आता आपला देश म्हणजे काय ? तो कसा चालतो ? हे जर समजून घेतले तर ब-याच गोष्टी सोप्या होतील. भारतात आपण लोकशाही
राज्यव्यवस्था स्विकारलेली आहे. ही व्यवस्था लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरवी चालवलेली
पध्दत समजली जाते. म्हणजे देशाचा नागरिक हा केंद्रस्थानी ठेवत देशाचा कारभार
चालावा अशी अपेक्षाही यात असते. हा कारभार कसा चालतो ? या
लोकशाहीचे तीन प्रमुख स्तंभ समजले जातात. पहिला म्हणजे संसद वा कायदेमंडळ. देशाचा
कारभार पहाण्यासाठी आवश्यक असणारे कायदे करणे हे या स्तंभाचे प्रमुख काम असते.
लोकसभा व राज्यसभा या स्तंभाच्या प्रमुख जागा. दुसरा स्तंभ हा कार्यकारी मंडळाचा.
देशाची घटना व कायदे यांबरहुकूम देशाचा कारभार हाकणे हे या स्तंभाचे मुख्य काम.
आपण या स्तंभाला सरकार म्हणून ओळखतो. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधानांसहित
त्यांचे मंत्रीमंडळ यांचा यात समावेश होतो. ही एक व्यवस्थापकीय यंत्रणा असते.
तिसरा स्तंभ हा न्यायव्यवस्थेचा. सर्वौच्च न्यायालय हे घटना व कायद्यांचा योग्य तो
अर्थ लावत देशाला न्याय देण्याचे काम करीत असते.
आपला शेतकरी म्हणून प्रामुख्याने संबंध येतो तो संसद व सरकार या व्यवस्थेशी.
या दोन्ही संस्थातील प्रतिनिधींची शेतीच्या बाबतीत काय मानसिकता आहे हे आजवरच्या
वाटचालीवरून सहज ओळखता येते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे प्रतिनिधित्व
करणारी संसद अस्तित्वात यायच्या आत एक प्रमुख घटना दुरूस्ती करण्यात आली व
परिशिष्ठ नऊ यात सारे शेतकरी विरोधी कायदे घालण्यात आले. विशेष म्हणजे हे कायदे
शेतक-यांना घटनेद्वारा मिळालेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारे असून या
कायद्यांच्या विरोधात शेतक-यांना न्यायालयात दादही मागता येणार नाही अशी भक्कम
तरतूद करण्यात आली. या परिशिष्ठ नऊचे सविस्तर विवेचन आपण नंतर कधीतरी करणारच आहोत,
परंतु या सा-या माहितीचा उपयोग आपली लढाई नेमकी कुठे व कोणाशी आहे हे ठरवतांना
होईल. काही कायदे शेतक-यांच्या बाजूचे वाटत असले तरी त्यांच्या अंमलबजावणीची
जबाबदारी ज्या सरकारनामक व्यवस्थेवर आहे त्याच्या कार्यपध्दतीत विकृती आल्याने
त्यांचे लाभ शेतक-यांना मिळत नाहीत. त्यामानाने न्यायव्यवस्था ब-याच अंशी
शेतक-यांच्या बाजूने काम करतांना दिसते. ज्या गोष्टी जीवाची बाजी लावून, गोळ्या वा
लाठ्या खाऊन शेतक-यांना शक्य होत नाहीत त्यावर न्यायालये सरकारला वठणीवर आणत असल्याची
उदाहरणे आहेत. शेतक-यांच्या आत्महत्यांद्वारा प्रकट होणा-या आक्रोशाकडे सरकारचे
जाणूनबूजून दूर्लक्ष झाले तरी न्यायालयांनी स्वतः दावे दाखल करून सरकारने यावर काय
उपाययोजना केली याबाबत सरकारला खडसावले आहे.
एकंदरीत ही सारी व्यवस्था, मग त्यात पक्ष कोण आहेत, व्यक्ती कोण आहेत हे सारे
गौण ठरत आपला लढा या मानसिकतेच्या विरोधात असला पाहिजे. आपली निवड ही पक्ष, धर्म,
जात, पैसा, दारू यापलिकडे जात मी ज्याला मत देणार आहे तो या व्यवस्थेशी किती
संबंधित आहे वा किती शेतकरी विरोधी आहे यावर आधारित असली पाहिजे. या व्यवस्थेत
ज्या प्रवृत्ती स्थिरावून लोकशाही व्यवस्थेतील त्रुटींचा गैरफायदा घेत ठाण मांडले
आहे त्या प्रवृत्तींना या व्यवस्थेबाहेर काढणे हे आपले मुख्य काम आहे. गाडी चांगली
आहे, काही बिघाड असला तर तो दुरूस्तही करता येईल मात्र खड्यात नेणा-या चालकाला
अगोदर बाजूला करावे लागेल. या बदलाच्या काळात कदाचित नवशिका चालकही यात चालू शकेल
परंतु या चिरेबंदी वाड्याला खिळखिळे करणे हे शेतक-यांचे प्रमुख ध्येय असले पाहिजे.
जनतेच्या पैशांवर गब्बर होणारी ही फुकटखाऊ मंडळी अगोदर हाकलली पाहिजे. ही सारी
मंडळी आज धर्म, जात, पक्षीय राजकारणाच्या आड लपत आपली कृष्णकारस्थाने करत असतात.
तशात आज या सा-या पक्षांना काही तत्वे वा धोरणात्मक वैशिष्ठे आहेत असे काही दिसत
नाही. निवडून येण्यासाठी खोटी आश्वासने देणे वा राष्ट्रहिताची शपथ घेऊन भ्रष्ट
कारभार करणे हा सा-या राजकीय पक्षांचा स्थायीभाव झाला आहे. स्वार्थासाठी निष्ठा
बदलत निर्लज्जपणे पक्षांतर करणे, निवडणुका लढवणे, एनकेन प्रकारे अवैध मार्गाने का
होईना निवडून येणे व पाच वर्षात केलेली गुंतवणूक दामदुपटीने वसूल करत लाखो
करोंडोंची माया जमवणे हा काही सन्माननीय अपवाद वगळता सा-या पक्षांचा मुख्य कार्यक्रम
झाला आहे. या पक्षांमध्ये तत्वे, धोरणे यापेक्षा पैशांचे आदानप्रदान यावरच मुख्य
भर असतो व या अवैध राजकीय सौदेबाजीत सामान्यांच्या हिताचा बळी जात असतो. त्यामुळे
पक्ष म्हणजे पवित्र गाय असे मानण्याचे काही कारण नाही. उलट लोकशाही समजण्याच्या आत
वा प्रगल्भ होण्याच्या आत पक्षीय राजकारणाने आजवर आपल्या लोकशाहीत जो काही धुमाकूळ
घातला आहे त्याचेच दुष्परिणाम आपण सारे भोगत आहोत. त्यामुळे ही पक्षीय संरचना
डळमळीत करणे हा प्रमुख कार्यक्रम असला पाहिजे व तो कुठल्याही निवडणुकीच्या
माध्यमातून मतपेटीद्वारा अमलात आणणे सहज शक्य होणार आहे.
जीवनात काही गोष्टी अपरिहार्य असतात. तसे लोकशाहीतील सरकारही असते. मुळात
सरकार हे सरकार असते व सरकार म्हणून त्याचे गुणधर्म असतात. पक्ष बदलल्याने सरकार
बदलेलच असे नाही याचा अनुभव आपण घेत आहोत. म्हणून पक्षीय बदलापेक्षा आपणच आपली
वागणूक अशी ठेवायची की कसेही सरकार आले तरी त्याला आपला वचक वाटला पाहिजे. जनतेचा
वचक सरकारवर कसा आणता येईल हे सर्वस्वी जनतेवरच अवलंबून आहे. ग्रामीण भागातील
स्त्रिया पदरात पडलेला नवरा घटस्फोट घेण्यापेक्षा त्याला ठिकाणावर कसा आणता येईल
याचाच विचार करतात. नवरा तो नवरा असतो, हा काय आणि तो काय, बदलण्यापेक्षा त्याला
हाताळण्याच्या आपल्या क्षमता वाढवीत नेणे हाच त्यावरचा खरा उपाय.
डॉ. गिरधर पाटील 8390388963