शनिवार, १० डिसेंबर, २०१६

अर्थक्रांती !! नागरिकांची ? देशाची ? की सरकारची ?



अर्थक्रांती !! नागरिकांची ? देशाची ? की सरकारची ?
          देशातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती जेवढी सक्षम तेवढी देशाची अर्थव्यवस्था सुदृढ समजली जाते. आणि हे दोन्ही घटक सरकारचे याबाबतचे आकलन, त्यावर आधारलेली एकंदरीत धोरणे व त्यांची अमलबजावणी यांच्याशी निगडीत असतात. म्हणजे हे सारे घटक सापेक्ष असून त्यांच्या परस्पर संबंधांतून देशाच्या अर्थव्यवस्थेची वास्तव मीमांसा करता येते. ज्याची व्याप्ती अजून कोणालाही अवगत नाही असा काळा पैसा हा भारतीय अर्थकारणात नेहमीच एक चर्चेचा विषय राहिलेला आहे. खरे म्हणजे काळ्या पैशांचा उगम वा वावर हा ज्या क्षेत्रात असतो ते लपून न राहिल्याने आपली कर व्यवस्था अशी निकोप करायची की काळ्या पैशांचे प्रमाण नगण्य असावे हे खरे असले तरी त्याला कारणीभूत असणाऱ्यांवरच त्याचा निपटारा करायची वेळ आली म्हणजे ते काम किती कठीण आहे हे आपण या दिशेने टाकलेल्या चलनबंदीच्या निर्णयातून अनुभवत आहोत.
हा विषय समजून घेतांना अर्थशास्त्र समजले नाही तरी काही मूलभूत आकडेवारी समजून घेतली पाहिजे. सरकारच्या व्याख्येनुसार ज्या उत्पन्नावर कर भरला जात नाही ते उत्पन्न काळे समजले जाते. ही व्याख्या परिपूर्ण नाही. तरीही कर भरण्याच्या प्रक्रियेशी ती जोडताच देशात कर भरणाऱ्या नागरिक, उद्योग वा आस्थापना यांच्याशी ती संलग्न करता येते. आता कर भरणाऱ्यांची संख्या ही देशाच्या लोकसंख्येच्या अडीच टक्के असल्याचे सांगितले जाते. यातील बव्हंशी करपात्र असलेले पगारदार असून त्यांचा कर कुठल्याही अनिमियतांशिवाय सरकारकडे जमा होतो. राहिलेल्या करदात्यांवर कडक नजर ठेऊन त्यांच्या उत्पन्नानुसार कर संकलित करणे हे फार कठीण काम असे नाही, मात्र याला करसंकलन व्यवस्था प्रामाणिक, हस्तक्षेपविरहित व तत्पर असावी लागते. शिवाय काळा पैसा हा केवळ कमवलेल्या उत्पन्नावरील बुडवलेला कर असा नसून अबकारी कर, विक्रीकर, सेवा कर अशा अनेक करांच्या वसूलीतील अनिमितपणामुळे निर्माण होत असतो. शिवाय याबाबतच्या साऱ्या तक्रारी, चौकशा, लवाद या सरकारच्याच अखत्यारित येतात. त्यांचा त्वरेने व प्रामणिकपणाने निपटारा करणे ही सरकारचीच जबाबदारी असते. म्हणजे या साऱ्या प्रक्रियेत सरकारशी संबंधित कर संकलन व्यवस्थेचा घनिष्ठ संबंध दिसून येतो. ही व्यवस्था जेवढी निकोप तेवढा काळा पैसा मर्यादित असे समीकरण मांडता येते.
यातील काळ्या पैशाचा दुसरा उगम हा नागरिकांनी भरलेल्या पांढऱ्या पैशातून म्हणजे सरकारी खर्च व सरकारच्या एकंदरीत राबवल्या जाणाऱ्या योजनांवर होणाऱ्या खर्चातून होत असतो. यातील सरकारची कळीची खाती व जागा या तशा लपून राहिलेल्या नाहीत. एक सर्वसाधारण प्रघात असा आहे की कुठलीही योजना, टेंडर वा खरेदीमान्यता यातील ठराविक टक्केवारी ही संबंधितांना पोहचल्या शिवाय ती जनतेच्या हितास पात्र आहे असे होत नाही. यात राजकीय व्यवस्थेचा व प्रशासनाचा वाटा अगदी बिनबोभाटपणे दरपत्रकानुसार ठरलेला असतो. हे उत्पन्न कुठल्याही करप्रणालीत येत नसल्याने स्थावर मिळकत, जमीनी, सोने वा शेअर्स अशा मार्गानी अर्थव्यवस्थेत येत असतो. हा खोटा पैसा खऱ्या पैशाला वाव देत नसल्याने या साऱ्या क्षेत्रातील वाढते दर प्रामाणिक क्षेत्राला यातून बाहेर ढकलत असतात. राजकीय मंडळींच्या एकंदरीत संपत्तीच्या चर्चा वा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टाकलेल्या धाडीतून हाती लागणारे घबाड यांतून असा पैसा किती असावा हे लक्षात येते. यातले सारे घटक हेही शेवटी सरकार या व्यवस्थेशी निगडित असल्याने त्याबाबत त्यांनीच काही केले तर होऊ शकेल. याचाच साधा अर्थ असा आहे की काळा पैसा हा शेवटी सरकारमुळेच निर्माण होत असल्याने आपल्यात सुधार केल्याशिवाय त्यात काही बदल होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
मात्र कुणीतरी उपभोगलेल्या सुखाचा परिणाम म्हणून येणाऱ्या प्रसववेदना मात्र आता देशभक्तीच्या नावाने सर्वसामान्यांनीच भोगाव्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक खोट्या चलनाचा थोड्याफार प्रमाणात होणारा निपटारा बघितला तर ज्या मात्रेत काळा पैसा उघड होईल असे सांगितले जात होते ते घडतांना दिसत नाही. एक उपाय खुंटला की सरकार लगेचच नवे नवे निर्णय घेत असते. त्यानुसार आता काळा पैसा असणाऱ्यांना तो उघड करण्यासाठी आमिषे दाखवत नव्या नव्या योजना जाहीर केल्या जात आहेत. हा सारा गोंधळ विषयाचा अभ्यास, परिस्थितीचे आकलन न करतांच केल्याने देशातील सामान्य जनता अगदी शेतकऱ्यांसकट भरडली जात आहे. किमान त्यांना काही दिलासा मिळावा अशी पावले सरकारकडून टाकली जात असल्याचे दिसत नाही.
या विषयात अभ्यापूर्व योगदान देणाऱ्या अर्थक्रांतीनुसार मोठ्या किमतीचे चलन अर्थव्यवस्थेतून बाद करणे हा उपाय सुचवलेल्या पाच कलमांपैकी एक आहे. या कलमापूर्वी देशातील कर व्यवस्थेतील क्रांतीकारी बदलाचे नावही सरकार घेत नाही. याच सरकारची काळ्या पैशाबाबतची निवडणुकीपर्वीची भूमिका निवडून आल्यावर फारशी गंभीर नव्हती.  आता सरकारचे अचानकपणे काळ्या पैशावर गंभीर व प्रामाणिक होणे हेही संशयास्पद वाटते.  निवडणुकीत काळा पैसा हा एक महत्वाचा मुद्दा होता व मला सत्ता द्या म्हणजे या साऱ्या काळा पैशाचा शोध घेत प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होतील हे आश्वासन जनता अजूनही विसरलेली नाही. सरकार यावर काही करीत नसल्याचे बघून शेवटी सर्वौच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एसआयटी नेमली गेली. काळा पैसा भारतात आणण्यावर अनेक सबबी सांगितल्या जाऊ लागल्या. परदेशी बँकांच्या माहितीनुसार हे काळा पैसा ठेवणारे कोण आहेत हे न्यायालयाचा आदेश असतांनाही सरकार सांगू शकले नाही. देशांतर्गत काळा पैसा बाळगणारी तमाम मंडळी म्हणजे उद्योगपती, व्यापारी, बिल्डर्स, व राजकारणी यांच्या विरूध्द कारवाई म्हणजे स्वतःवरच कारवाई असे समीकरण असल्याने त्याबाबतीतल्या अनेक चौकशा, कारवाया जैसे थे ठेवण्यातच सरकारची मानसिकता दिसून आली. एवढेच नव्हे तर आपले उद्योग आपल्या तथाकथित ताळेबंदानुसार  तोट्यात असल्याचे दाखत सरकारी बँकांची कर्जे एनपीए करत त्या बँकांतील प्रामाणिक नागरिकांचा पैसा हडप करणाऱ्यांना अभय व शेतकऱ्याचे पाचपंचवीस हजार थकले म्हणजे त्याच्यावर जप्तीची कारवाई ही परंपरा हे सरकारही खंडीत करू शकले नाही.
अशा या देशभक्त सरकारला शेवटी सामान्य नागरिकांना देशभक्तीचे आवाहन करत आपल्या चुकांचे प्रायश्चित्त घ्यावे म्हणून आळवणी करावी लागते यातच या प्रयत्नाचे मर्म दिसून येते. 
                                                       डॉ. गिरधर पाटील 9422263689

सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण ?



    शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण ?
          एकदा नव्हे दहांदा कबूल केले की चलनबंदीचा निर्णय योग्य होता, तरीही त्या निर्णयाच्या परिणामांची मीमांसा करू नये असे मात्र मुळीच नाही. हा देश चालवण्याचे काही अधिकार सरकारला असले तरी साऱ्या देशावर व्यापकतेने व खोलवर परिणाम करणाऱ्या निर्णयांबाबत निर्णय करणाऱ्यांनी पुरेसा अभ्यास करूनच ते लादावेत अशी अपेक्षाही गैर नाही. अशा निर्णयामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास हा त्यांनी आले या भोगासी वा देशभक्तीचे आवरण चढवत सहन करावा हे आवाहनही तसे गैर नाही कारण त्यात तसे काही नुकसान नसून पैसे मिळण्यातील कठीणता वा अडचणी अशा प्रकारात ते मोडते. मात्र समाजातील एका मोठ्या वर्गाचे उत्पन्न हाती आले असता ते मुळातच विकले न गेल्याने त्यांचे सरळ सरळ आर्थिक नुकसान झाले आहे हा गुणात्मक फरक शहरी व शेतकरी यांच्या नुकसानीत दिसून येतो. शेतकऱ्यांना हाताशी धरून जिल्हा बँकांना चलन बदलाची परवानगी द्यावी हा राजकीय पदर असलेला दुराग्रह माध्यमांनी उचलून धरला तरी या निर्णयामुळे आपल्या बंदिस्त शेतमाल बाजारात ज्यांच्या हाती खरेदीचे अधिकार एकवटले आहेत त्यांनी मातीमोल भावाने हा माल खरेदी केला व शेतकऱ्याची माती केली त्याबद्दल कोणी ब्र शब्द बोलायला तयार नाही.
          शेतमाल बाजाराची परवड ही तशी तीनचार महिन्यांपासून म्हणजे नियमनमुक्ती व आडतीचा निर्णय या बाजारात लागू केल्यापासून सुरू झालेली दिसते. कधी नव्हे ते यावर्षी दोन पैसे फायदा व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा यावर्षी व्यापाऱ्यांनी दोन महिने लिलाव बंद ठेऊन कुजवला व त्याच दरम्यान हंगामाच्या सुरुवातीला स्वस्तात घेतलेला कांदा विकून ते मोकळे झाले. सोयाबीनच्या दर्जाबद्दल प्रश्न निर्माण करत सारा सोयाबीन किमान हमी दरापेक्षा कमी दरात खरेदी केला. डाळींबाबतही तसेच काहीसे झाले. हा बाजार इतक्या दयनीय अवस्थेत असतांना त्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेत काय हाहाकार माजेल याचा विचार वा अभ्यास नकरता चलनबंदीचा निर्णय लादला व त्या उंटावरच्या शेवटच्या काडीमुळे तर सारा बाजारच ठप्प झाल्याचे चित्र बघायला मिळायले. एकीकडे शेतात तरारलेल्या पिकाचे दोन पैशात रुपांतर करून वर्षाचा खर्च भागवण्याची स्वप्ने पहाणारा शेतकरी दारात आलेल्या लक्ष्मीचे आता काहीच हाती लागणार नाही या भावनेने शोकाकूल झाला. एकीकडे देशात केवळ अडीच ते तीन टक्के लोकसंख्या, ज्यात बऱ्याच प्रमाणात पगारदारही आहेत, आयकर भरून वा न भरून काळा पैशांच्या निर्मितीला कारणीभूत ठरत असतांना त्याच देशातील पंचावन्न टक्के लोकसंख्येच्या घटनादत्त उपजिविकेच्या अधिकारावरच घाला घालत त्यांना त्यांच्या हक्काचे उत्पन्नही मिळू द्यायचे नाही इतपर्यंत या निर्णयाचे परिणाम बघायला मिळतात. एकीकडे कर न भरणारा देशद्रोही, कर भरणारा व त्यासाठी रांगेत उभा रहाणारा देशभक्त ठरत असेल तर देशासाठी आपल्या उत्पन्नावर पाणी सोडणाऱ्या शेतकऱ्याला काय म्हणावे हा प्रश्न विचारण्याजोगा असला तरी शेवटी या नुकसानीला कोणाला तरी जबाबदार ठरवणे अपरिहार्य आहे. कारण यात शेतकऱ्यांचा काही एक दोष नसतांना त्यांना या सुलतानी, नव्हे तर तुघलकी संकटाला सामोरे जावे लागते आहे.
          वास्तवात सरकार ज्या मानभावीपणे देशहिताचे कारण देत या निर्णयाची भलामण करते आहे, वास्तवात ते तसे मुळीच नाही. आयकर विभागाकडे अनेक काळ्या पैशांची प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांचा गतीने व निष्पक्षपणे निपटारा झाला असता तरी बराच काळा पैसा बाहेर येऊ शकला असता. आपल्या मर्जीतील उद्योगांचे करच नव्हे तर सरकारी बँकांची कर्जे व सरकारची इतर देणी यांच्या लवादावर सरकारला काही करावयाचे नाही. सर्वौच्च न्यायालयाने देशातील करबुडव्यांची व काळे धन बाळगणाऱ्यांची यादी प्रसिध्द करायला सांगूनही सरकार त्याला बधले नाही. एवढेच नव्हे तर देशातील एनपीए झालेल्या वा केलेल्या उद्योगांची यादीही सरकार प्रसिध्द करायला तयार नाही. लाखो करोंडोचे कर्ज बुडवून परदेशात राजरोसपणे चैन करणाऱ्या उद्योगपतींना हात लावायची सरकारची तयारी नाही. म्हणजे सरकार म्हणून स्विकारलेल्या प्राथमिक कर्तव्यांबाबत एवढा ढिसाळपणा असतांना केवळ अडीच टक्के लोकसंख्येतील काही चुकार लोकांसाठी साऱ्या प्रामाणिक देशाला वेठीस धरत देशभक्तीचे डोस पाजले जात आहेत.
          सरकार आता या निर्णयामागे लोक कसे उभे आहेत याचे भ्रामक चित्र माध्यमांतून रंगवण्याचा प्रयत्न करते आहे. देशातील ज्यांना थोडेफार अर्थशास्त्र कळते अशांच्या मते केवळ खोटे चलन या निर्णयामुळे बाद होईल. देशातील काळा पैसा जो चलनात वावरतो तो दोन तीन टक्के असून नवशिक्या भ्रष्टाचाऱ्यांकडेच असू शकतो. जे यात मुरलेले असतात ते आपला काळा पैसा चलनात ठेवतात हा सरकारचा भ्रम आहे कारण तो येण्यापूर्वीच त्याच्या गुंतवणुकीचे मार्ग ठरलेले असतात. आज शहरी वा ग्रामीण भागातील अचानक वाढलेले जमीनींचे भाव, गेल्या काही वर्षांत वाढलेली सोन्याची आयात, शेअर बाजारातील वाढती गुंतवणुक वा परदेशी गुंतवणुकीच्या नावाने येणारा वाढता पैसा हे सारे काळा पैशांच्या अवैध गुंतवणुकीचे परिणाम आहेत. मुळात साऱ्या सरकारी बँका करबुडव्या व कर्जबुडव्या उद्योगांमुळे अडचणीत आल्या होत्या व त्याचवेळी होणारे रुपयाचे अवमुल्यन त्यांना अधिकच महाग पडले असते. या अगोदरच्या काळा पैसा जाहीर करण्याची सारी आवाहने फोल ठरल्याने बँकेत पैसाच येईनासा झाल्यावर तो एनकेन प्रकारे कसा येईल या सुपीक डोक्यातून ही कल्पना आलेली दिसते. यातून जमा झालेल्या पैशांना ठेवी म्हणत सरकार व बँका आपली पाठ धोपटून घेत आहेत, वास्तवात तो सर्वसामान्य जनतेचा पैसा तुम्ही जबरदस्तीने जमा करायला लावून काढण्यावर निर्णय लादल्यानेच जमा झालेला आहे. चलन म्हणून त्याचा वापर मर्यादित झाल्यानेच बँकाच्या खात्यावर जमा दिसतो एवढाच त्याचा अर्थ आहे.
या विषयावर अत्यंत तपशीलवार अभ्यास करून मते मांडणाऱ्या अर्थक्रांतीनुसार देशाची अर्थव्यवस्था सुधार कार्यक्रमातील केवळ एक भाग वापरत एक क्रांतीकारी निर्णय असा आभास निर्माण केला जात आहे. त्यानी सुचवलेल्या कर सुधारणा व त्यातील भ्रष्टाचार कमी केला असता तरी यापेक्षा अधिक देशभक्ती सिध्द झाली असती. मात्र आता सत्ताकारण व पक्षीय राजकारणाच्या कुरघोडीत सर्वसामान्यांची अशीच फरफट होत रहाणार हे मात्र नक्की !!   
                                                             डॉ. गिरधर पाटील 9422263689

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

ग्रामीण सहकारी बँका - कार्यपध्दती व कार्यक्षमता



ग्रामीण सहकारी बँका - कार्यपध्दती व कार्यक्षमता
          भारताचा खरा पिंड हा शहरी कधीच नव्हता. स्वातंत्र्य मिळतेवेळी बोटावर मोजण्याइतकी शहरे होती व सारा भारत हा ग्रामीण भागात विखुरलेला होता. औद्योगिकरणाच्या माध्यमाने ज्या काही नव्या रोजगाराच्या वा शैक्षणिक संधी उपलब्ध झाल्या त्यातून शहरीकरणाची प्रक्रिया सुरु झालेली दिसते. अर्थात साऱ्या जगात हे घडत असल्याने जी राष्ट्रे औद्योगिकीकरणात यशस्वी झाली त्यांना याचे फारसे परिणाम जाणवलेले दिसत नाहीत, मात्र ज्यांनी अट्टाहासाने औद्योगिकीकरणाची कास धरली अशी भारतासारख्या विकसनशील देशांची मात्र न घरका न घाटका अशी अवस्था झालेली दिसते. त्यातून शहर व्यवस्थापन व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने न पेलवणारी बकाल व विकासाच्या असमतोलाला कारणीभूत ठरणारी एक नवीनच संस्कृती आपण जन्माला घातली आहे.
शिवाय आपल्याकडे ग्रामीण विकासाच्या नावाने ज्या काही संस्थात्मक संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न झाला त्यात सहकाराचा प्रमुख वाटा दिसून येतो. या सहकारातील कृषि प्रक्रिया उद्योगामुळे ग्रामीण भागाचा विकास झाल्याचे दिसत असले तरी त्यात ग्रामीण पतपुरवठ्याचाही एक प्रमुख उद्देश असल्याचे दिसते. सुरुवातीच्या नियोजनकारांनी ग्रामीण क्षेत्राचा पतपुरवठा करण्यासाठी सहकारी संस्थात्मक व्यवस्था उभारत गाव पातळीवर विविध कार्यकारी सोसायटी ते राष्ट्र पातळीवर नाबार्ड सारख्या संस्थांची निर्मिती झाली. आज या सा-या व्यवस्थेची अवस्था बघता आपण ग्रामीण पतपुरवठ्याचे उद्दिष्ट खरोखर साध्य केले आहे का याचे उत्तर मात्र नकारार्थीच येते.
या साऱ्याचा अभ्यास करता मुळात सहकार ही संकल्पना चांगली असली तरी ती राबवतांना तिचा उपयोग मात्र पक्षीय राजकारण व सत्ताकारणासाठी केल्याने त्यातील अपेक्षित गुणात्मक परतावा हा व्यापक जनहिताऐवजी एका ठराविक स्वार्थी हेतुभोवती संकुचित होत आज अगदी विदारक अवस्थेला पोहचला आहे. आज राज्यातीलच नव्हे तर सा-या देशातील सहकार क्षेत्राची जी काही अवस्था झाली आहे त्यात जनसामान्यांचे करोडो रुपये खर्ची पडून देखील ग्रामीण जनतेचे भोग काही संपलेले नाहीत. उलट या सा-या संस्थात्मक व्यवस्थेची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झालेली दिसते. म्हणजे इतरांच्या दृष्टीने सारा डोलारा उभा असलेला दिसत असला तरी लाभार्थ्यांच्या दृष्टीने उपयोगिता मात्र शून्य अशी अवस्था झाली आहे. ग्रामीण पतपुरवठ्याच्या बाबतीत आता काही राष्ट्रीकृत वा खासगी बँकांचा ग्रामीण क्षेत्रात प्रवेश झाला असला तरी त्यांना एकंदरीत ग्रामिण अर्थकारण व त्यांची एकंदरीत कार्यपध्दती जूळवून घेतांना जड जात असल्याचे दिसते आहे.
या सगळ्या विवेचनाचे मुख्य कारण म्हणजे आज चलनबंदीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत ग्रामीण बँकांचा सहभाग हा त्यांच्याच एकंदरीत कर्तृत्वामुळे नगण्य राहिला आहे व ग्रामीण जनतेला त्यांची काही एक चूक नसतांना त्याचे परिणाम भोगावे लागताहेत. या कोलाहलात शहरी जनतेला केवळ त्यांचे पैसे मिळण्यात त्रास व असुविधा सहन करावी लागली असली तरी ग्रामीण भागातील सारेच कृषि उत्पादन तयार असून देखील बाजारात आलेल्या मंदीमुळे विकलेच न गेल्याने त्यांचे नुकसान व शहरी लोकांची असुविधा यांची तुलना करता येणार नाही. यातही आपल्या बंदिस्त बाजार व्यवस्थेत या संधीचा फायदा घेत सारा शेतमाल मातीमोल भावात हडप करण्याचा प्रयत्न झाला असला तरी त्यावर परिणामकारक प्रतिबंधक उपाययोजना न केल्याने सारा शेतकरी समाज आर्थिक गर्तेत लोटला गेला.
चलनबंदीचा मोठा फटका शेतमाल बाजाराला बसणारच होता. यात चालणारे व्यवहार हे प्रामुख्याने रोखीत व नोंद न होणारे असणारे असल्याने त्यात पाचशे व हजाराच्या नोटा असणार हे स्वाभाविक होते. त्यातून खबरदारी घेतांना शेतमालाचे पैसे मिळवून द्यायची ज्यांची कायदेशीर जबाबदारी आहे त्या बाजार समित्यांनी त्यांच्याशी करारबध्द असलेल्या व्यापाऱ्यांचे चेक वा खुद्द बाजार समितीचेच चेक देऊन सारे व्यवहार पार पाडले असते तर एवढा गोंधळ झाला नसता. नाहीतरी शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा साध्या कपट्यावर त्यांच्या पट्टीचा आकडा लिहून त्यांची बोळवण केली जात असतांना तशी पध्दत यावेळी का अवलंबली नाही हे कळत नाही.
या चलनबंदीत नोटा बदलून देण्याच्या प्रक्रियेतून जिल्हा सहकारी बँका व पतसंस्थांना वगळले गेले हे आजची परिस्थिती बघता योग्यच असले तरी त्यांची सारी यंत्रणा व खातेदारांचे हित बघता रिझर्व बँकेचा एकादा सक्षम अधिकारी पाठवून त्याच्या नियंत्रणाखाली शेतक-यांचे व खऱ्या खातेदारांचे व्यवहार पार पाडता आले असते. एकीकडे जाहीर करायचे की शेतकऱ्यांनी भरणा केलेल्या पैशांबाबत कुठलीही चौकशी केली जाणार नाही व दुसरीकडे त्याला कुठलीही संधी द्यायची नाही अशा त्रांगड्यात ग्रामीण जनता सापडेलली दिसते. यात एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी शेतक-यांची खरी मागणी त्यांचा तयार झालेला शेतमाल योग्य भावात विकला जावा हीच होती. सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे मुळात पैसाच येत नसल्याने तो काळा की गोरा यापेक्षा शेती जिवंत रहाण्यापुरता पैसा जरी त्याच्याकडे आला तरी त्याचे भागते. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर या सहकारी बँकांमध्ये ज्या वेगाने पैसा आला तो संशयास्पद होता. या माध्यमातून आपला काळा पैसा पांढरा करण्याचे प्रयत्न शेतक-यांना होणाऱ्या त्रासाचे निमित्त करून का होईना झाला परंतु ते झाले नाही हे एक प्रकारे बरेच झाले. 
सत्ताधा-यांचेही सारे दात एकसारखे समजण्याचे कारण नाही. केंद्राने अतिशय काळजी घेत हा निर्णय राबवला असला तरी ग्रामीण पतपुरवठ्याची ही हलाखीची परिस्थिती ही काही आज आलेली नाही. राज्यातील शिखर सहकारी बँकेपासून जवळ जवळ सा-या जिल्हा बँका या भ्रष्टाचारी गैरप्रकार व अनियमिततांच्या शिकार झाल्याअसून त्यांचे गैरप्रकार न्यायालयात सिध्द होऊनही केवळ राजकीय कारणांमुळे त्यांच्यावर अजूनही कारवाई झाल्याचे दिसत नाही. तसा राजकारण्यांच्या दृष्टीने सहकार ही एक दुभती गाय आहे. मग ते साखर कारखाने असोत, बाजार समित्या असोत, जिल्हा बँका असोत, सुतगिरण्या असोत यात सत्ताधारी व विरोधकांचा सारखाच वाटा आहे. मग कारवाई न करता हे भरलेले ताट आपल्याला आहे तसे मिळावे हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न मात्र ग्रामीण जनतेच्या उरावर उठणारा हे मात्र खरे  !!
                                                                 डॉ. गिरधर पाटील 9422263689
  

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

विरोधाभासी शेतकरी संघटना



             विरोधाभासी शेतकरी संघटना
          आजच्या सा-या शेतकरी संघटनांचे गुणविशेष त्यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीशी राहलेले नसून त्या वेगवेगळ्या नावाने व त्या चालवणाऱ्या नेत्यांच्या कार्यपध्दतीनेच ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. यातील मूळची मातृसंघटना जी आज शरद जोशींचे नाव घेत आपले वेगळे अस्तित्व राखून आहे त्याचबरोबर राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथ दादांची सावत्र शेतकरी संघटना, विदर्भात एकेकाळी संघटनेची पाळेमुळे रुजवणा-या परंतु कोण्या कारणाने शेतकरी संघटनेपासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांचे नवे प्रयत्न व आताशा उगवलेल्या शेतकरी संघटनेचे बिरूद लावणाऱ्या अशा अनेक संघटना यांचा समावेश होतो. खरे म्हणजे या सा-या शेतकरी संघटनांचा किमान माध्यमांतील शेतकऱ्यांप्रती जाहीर होणारा कळवळा लक्षात घेता आपल्या पाठीमागे एवढी मोठी ताकद असल्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदच वाटायला हवा. कारण एवढ्या संघटना व त्यांचे नेतृत्व पाठीशी असतांना आता आपले सारे प्रश्न चुटकीसरशी मिटतील असा आत्मविश्वास वाटण्याऐवजी सामान्य शेतकरी मात्र साध्या साध्या समस्यांनी ग्रस्त होत आता आपला कोणी वाली आहे का याच्या शोधात असलेला दिसतो. एकीकडे महत्प्रयासाने अर्थवादाकडे आशेने पहात असलेला शेतकरी शेवटी जातीयवादी आधार शोधण्याच्या प्रयत्नात वेगळ्या वाटेने जाऊ लागल्याचेही चित्र दिसू लागले आहे.
          या सा-या शेतकरी संघटना विविध नावाने ओळखल्या जात असल्या तरी त्यांच्या उगमापासूनच एका विरोधाभास व वेगळेपणा टिकवण्यासाठी घेतलेल्या भूमिकांचा समावेश असल्याने त्यांचे विराधाभासी शेतकरी संघटना असे नामाभिषान करावयास हरकत नाही. या साऱ्या शेतकरी संघटनांचा समाजकारणात व विशेषतः राजकारणात वावरण्याचा पासवर्ड मात्र एकच असून शरद जोशींचा विचार हेच आमचे भांडवल हे मिरवत शरद जोशींना शेतक-यांचे पंचप्राण, महात्मा, युगात्मा म्हटल्याशिवाय त्यांचे कुठलेही कार्यक्रम सुरू होत नाहीत. याबाबत कुणाला हरकत घेण्याचे कारण नाही परंतु शरद जोशींना शेतक-यांच्या प्रश्न व समस्यांबाबत जो काही कळवळा व समज होती तिचा लवलेशही नसलेल्या या शेतक-यांच्या संघटना शेतक-यांचे अगदी गाव पातळीवरच्याही समस्या हाताळण्यात अपयशी ठरल्या असून शेतक-यांचे प्रश्न मात्र दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे या साऱ्या संघटनांच्या खिसगणतीतही नसल्याचे दिसते आहे.
          घरातला आधारवड जावा व साऱ्यांची अवस्था सैरभैर व्हावी तसे मातृ शेतकरी संघटनेचे झाले आहे. विचारांचा स्वामित्व हक्क तसा अजून मान्य न झाल्याने शरद जोशींच्या वैचारिक वारशापेक्षा त्यांच्या इतर वारशावरचा हक्क अबाधित ठेवण्यातच त्यांची सारी मदार पणाला लागते आहे. वैचारिक नेतृत्वाच्या अभावामुळे प्रत्यक्ष कार्यापेक्षा शरद जोशींची आळवणी करण्यातच आपले अस्तित्व असल्याचे लक्षात आल्याने शरद जोशींशी भावनिक नाते असल्यांना दिलासा देत रहाणे व शरद जोशींच्या विरोधात कुठे काही खुट्ट झाले की चवताळून उठणे हेच त्यांचे मुख्य काम उरले आहे. मागच्या शतकात आंध्रचे तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेले एन टी रामाराव हे एक प्रखर व प्रभावी राजकीय नेतृत्व म्हणून गाजलेले असले तरी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसा व घरगुती वारसा यांच्या संघर्षातील त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू व दुसरी बायको लक्ष्मीपार्वती यांच्यातील कलगीतुरा तसा जगजाहीर असून शेवटी वैचारिक वारशालाच सर्वसामान्यांनी मान्यता देत चंद्राबाबूंना प्राधान्य दिले हे लक्षात घ्यावे लागेल. शरद जोशींचा विचार मानणारे खरे कार्यकर्ते या साऱ्या गदारोळापासून दूरच रहाण्याचे पसंत करीत असून शरद जोशींच्या नावाने ओळखली जाणारी संघटना आता संघटनात्मक बाबींपेक्षा त्यांच्या स्मारक वगैरेसारख्या कार्यक्रमातून सक्रिय झाल्याचे दिसते आहे. दुसरीकडे सत्ताकारणाला धक्का न लावणा-या तंत्रज्ञानाचा त्यांनी आता मुख्य मुद्दा घेतला असून सत्ताधा-यांशी प्रत्यक्ष संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
          स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उगमच ज्या जातीयवादाच्या विरोधातून झाला त्याच्या नेमके अगदी उलटी त्यांची राजकीय वाटचाल चालू असून खरा विरोधाभास त्यांच्या भूमिकातून दिसतो आहे. काही गोष्टींचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने काही गौप्यस्फोट करायला काही हरकत नसावी. शेतकरी संघटना एन डी एत सामील झाली त्यात संघटनेचा जातीयवादी पक्षांपासून दूर रहाण्याच्या भूमिकेचा पराजय असल्याने आम्ही आमची वेगळी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन करतो यातून या संघटनेचा जन्म झाला. मात्र यामागच्या घडामोडींची त्यांना माहिती दिसत नाही. ही युती होण्यापूर्वी नागपूरच्या कार्यकारिणीत काही खडाजंगी झाली. शेतकरी संघटनेची या निवडणुकीतील राजकीय भूमिका या विषयावर चर्चा होत असतांनाच गोविंद जोशीसारख्या कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेने दबाब गट म्हणूनच कार्यरत रहावे व निवडणुकांमधला आपला आजवरचा अनुभव लक्षात घेता आपण निवडणुकांच्या भानगडीत पडू नये असे मत मांडले. मात्र रघुनाथदादा, वामनराव चटप यांचा एक गट काही झाले तरी आता आपल्या निवडणुकांशिवाय पर्याय नाही या मतावर ठाम होता. शरद जोशींची अवस्था विचित्र झाली. निवडणुका नकोत हा निर्णय आताच घेतला तर राजकारणाची चव घेतलेल्या कार्यकर्त्यांनी वेगळा निर्णय घेतल्यास आणीबाणीची परिस्थिती येत शेतकरी संघटनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला असता. म्हणून चर्चेतला पुढचा भाग युती कोणाशी यावर जास्त उहापोह न करता भाजपा व काँग्रेस यांना समान अंतरावर ठेवत ज्यांच्याशी आपली बोलणी लाभदायक ठरतील त्यांच्याशी युती करावी असे ठरत रघुनाथदादा व वामनराव चटप यांना दिल्लीला बोलणी करण्यासाठी पाठवायचा निर्णय झाला. हा निर्णय शेतकरी संघटनेच्या तत्वांपेक्षा या दोन्ही पक्षांचीही तत्वे डोळ्याआड करत कांहीची निवडणुकीय सोय यासाठी घेतल्याचे दिसते. दिल्लित काँग्रेसच्या अहमद पटेलांनी सोनिया गांधीकडून वेळ मिळवून तुमची भेट घालून देतो तोवर थांबा असे सांगितल्यावर मधल्याकाळात हे दोघे अशा कामासाठी आल्याची बातमी प्रमोद महाजनांना लागली व त्यातील गांभिर्य लक्षात येताच त्यांनी या दोघांना पाचारण करत सारी निवडणुकीची गणितं समजावत एनडीएच कशी सोईची राहील या दृष्टीने बोलणी निर्णायक स्वरूपाला आणली. त्याचवेळी अशी युती होत असल्याची बातमी माध्यमातून प्रसारित होईल हेही बघितले गेले. शरद जोशींना अशी बालणी चालू आहेत याची माहिती असली तरी युती झाल्याची बातमी त्यांनाही सर्वसामान्य शेतक-यांप्रमाणे सातच्या बातम्यातूनच समजली असावी. दादा व चटप हे दिल्लीच्या डावपेची राजकारणाचे बळी ठरत असतांनाच माध्यमातून बातम्यांतून हे वृत्त प्रसारित झाल्याने परतीचे दोर कापले गेले व त्यानंतर झालेली युती कशी फायद्याची आहे हे पटवण्यात येऊ लागले. स्वतः शरद जोशी या निर्णयामुळे समाधानी असल्याचे दिसत नाही कारण नंतरच्या निवडणुक प्रचारात ते व मी बरोबर असतांना त्यांनी या साऱ्या प्रकाराबाबत अनेकवेळा नाराजी प्रकट केली होती व जे काही चालले आहे ते शेतकरी संघटनेच्या पिंडाविरूध्द आहे अशी त्यांची भावना होती.
          याचा प्रत्यय पुढेही आलेला दिसतो. निवडणुकांनंतर शरद जोशींना राज्यसभेवर घ्यावे या निर्णयाची अमलबजावणी ज्या सन्मानाने व्हायला हवी होती तेवढे दूर्लक्ष होऊ लागल्याचे स्पष्ट होऊ लागले. भाजपाच्या कोट्यातून जागा देण्याविषयी नाराजी स्पष्ट होताच शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकऱ्यांनी मात्र आपण शब्द दिला आहे तो पाळलाच पाहिजे अशी भूमिका घेत शेवटी शिवसेनेच्या कोट्यातून शरद जोशी राज्यसभेवर गेले. आणि त्या नंतरचा इतिहास सर्वांना माहितच आहे.
          म्हणजे ज्या भाजपावर नाराजी व्यक्त करीत राजू शेट्टींनी शेतकरी संघटनेची वेगळी चूल मांडली त्यांनाच शेवटी भाजपाबरोबर जात आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करावी लागली यासारखा विरोधाभास कुठेही नसेल. रघुनाथ दादांची संघटना ही वेगळी शेतकरी संघटना नसून शेतकरी संघटनेतील एक वेगळा गट स्वतंत्रपणे आपले अस्तित्व राखून आहे. शेतकरी प्रश्न सोडवण्यातील त्यांची प्रामाणिकता आजतरी दिसते आहे. एकदा सत्ता मिळाल्यानंतर त्यांचाही राजू शेट्टी होऊ नये म्हणजे मिळवली. राजू शेट्टींच्या राजकीय यशाचा एक महत्वाचा भाग विसरला जातो त्यामागे शेतकरी संघटनेच्या प्रभावापेक्षा त्या भागातील साखरपट्ट्याचे स्थानिक राजकारण, त्यातील जातीय समीकरणे यांचा प्रभाव जास्त दिसतो. नवी संघटना काढण्यामागे भाजपाशी झालेल्या युतीचे तात्कालिक कारण असले तरी साखरपट्ट्यातील उस आंदोलन केंद्रस्थानी असलेल्या भागात नेतृत्वाच्या वर्चस्वावरून रघुनाथदादांशी करावा लागणारा संघर्ष व मातृ शेतकरी संघटनेच्या मुख्यालयातून राबवली जाणारी तोडा-फोडा व राज्य करा निती हे खरे कारण असावे. राजू शेट्टींचा वापर काँग्रेसला तसा निरूपयोगी वाटत गेल्याने राजकीय विजनवासापेक्षा भाजपाशी जुळवून घेणे राजू शेट्टींना भाग पडले असावे. मात्र शेतकरी चळवळीतील एक मोठा घास घेतल्याची भाजपाची खेळी अचूक ठरली असून ही संघटना आता शेतक-यांबाबत तशी निरुपयोगी ठरणार असल्याचे दिसते आहे. शेतक-यांबाबत जाहीर भाषणांतून ते जे काही बोलतात त्याचा लवलेशही ते सत्तेत असलेल्या कारभारात दिसत नाही. आता ते व्यवस्थेचा एक भाग झाले असून शेतकरी हितापेक्षा त्यांनी उभा केलेला डोलारा सांभाळत रहाण्याचे महत्वाचे काम त्यांच्याकडे उरले आहे.
          यात दखल घ्यावी असे शेतकरी संघटनेची बांधिलकी मानणा-या विदर्भातील काही प्रामाणिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न दखलपात्र आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यपध्दतीतून निर्माण झालेल्या वितुष्टातून कुठलाही कडवटपणा न दाखवता दूर गेलेली मंडळी आजही शेतक-यांच्या प्रश्नांवर तेवढीच अभ्यासपूर्ण मांडणी करतांना दिसतात. विजय जावंधिया, प्रकाश पोहरे व लक्ष्मण वंगे यांनी तर अखिल भारतीय स्तरावर किसान एकताच्या मंचावर शेतकरी संघटनेच्याच नावाने कार्य सुरू केले असून जागतिक स्तरावर शेतमाल भावाची एक नवी मांडणी, विशेषतः आजच्या सरकारची आयात निर्यातीची धोरणे व त्याचा भारतीय शेतमाल बाजारावर होणारा परिणाम यावर अभ्यासपूर्ण प्रबोधन सुरु केले आहे. चंद्रकांत वानखेडे हे तरूणांमध्ये विशेष लोकप्रिय असून त्यांचीही अभ्यासपूर्ण भाषणे व विश्लेषण गांभिर्याने घेतले जात आहे.
          शेवटी शरद जोशी ही व्यक्ती की विचार यात त्यांनी मांडलेला विचार यात त्यांचा विचारच प्रबळ ठरणार असून शेतकरी संघटनेच्या सा-या वाटचालीत त्यांचाही तोच प्रयत्न होता. विचाराबरोबर त्याची सक्रिय अमलबजावणी यावरही शरद जोशींचा कटाक्ष असे. त्यामुळे बैठकीला येणारा कार्यकर्ता आंदोलनात येतो की नाही यावर त्यांचे जातीने लक्ष असे. दुर्दैवाने शरद जोशींनी आपल्या जीवनाच्या योगदानातून उभारलेली ही चळवळ सध्यातरी स्थित्यंतरातून जात असल्याने त्यांचा विचार आत्मसात करून तो नव्याने मांडणारी नवी पिढी तयार होत नाही तोवर दुधाची तहान ताकावर भागवणे आपल्या, म्हणजे शेतक-यांच्या हाती आहे.
                                                                          डॉ. गिरधर पाटील 9422263689