घटना अनेक, अर्थ मात्र एक ....
मागच्या आठवड्यातील दोन ठळक घटनांचा
नेमका अर्थ काढला तर पक्षीय राजकारणाच्या पलिकडे गेलेली एक नवी राजकीय संस्कृती
आपण नकळत कशी स्विकारलीय याचा प्रत्यय येतो. सध्याची राजकीय व्यवस्था, कायदे व
प्रशासन यांच्यातील जाणूनबूजून ठेवलेल्या भ्रष्टाचारपूरक व भ्रष्टाचारसुलभ
त्रुटींचा गैरफायदा घेत ही संस्कृती जोपासलीच नव्हे तर जोमाने फोफावते आहे व
यातूनच आपण अनुभवत असलेल्या व्यापक राजकीय व्यवस्थेला कच्चा माल पुरवणारी व बळकट
करणारी व्यवस्था म्हणून विकसित होत आहे. प्राथमिक स्तरावर या व्यवस्थेला पक्षीय
राजकारणाचे आवरण चढवत त्यातील मनुष्यबळ विकसित होत असले तरी पुढे जाऊन सत्ताकारणात
होणारी सरमिसळ बघता हे पक्षीय भेदाभेद विसरून केवळ स्वार्थ याच मुद्याभोवती सारे
राजकारण घोटाळत असते. या राजकीय संस्कृतीचे वैशिष्ठ्य असे की ती सामान्यांचे शोषण
करीत असतांना सर्वसामान्यांना आपल्या शोषणाच्या दुःखापेक्षा आपण कसे बचावलो याचेच
अप्रुप वाटत असते व ज्यात खरे सुख व समाधान आहे तो प्रामणिकपणाचा पण कष्टाचा मार्ग
टाळून अमूक नेत्याने कशी मदत केली या उपकाराच्या बोज्यात त्या नेत्याचे तसे बळ कसे
वाढेल याला नकळत साथही मिळत असते.
अन्याय निवारण्याचे खरे सनदशीर मार्ग
टाळून अशा चोरवाटांनी वावरायची सवय खरे म्हणजे विहित मार्गाने न्याय मिळेलच व तो
कधी मिळेल याची खात्री नसल्यानेच लागत असते. यात जनतेचा दोष नसून अशी व्यवस्था
वर्षानुवर्षे काहीच सुधार वा बदल न करता तशीच ठेवणा-या राज्यकर्त्यांचा असतो. शिवाय
या व्यवस्थेतील जनतेवर होणा-या अन्यायापेक्षा या राजकीय व्यवस्थेला होणारा फायदा
अधिक असल्यानेच माहित असून देखील उघड उघड सारे गैरप्रकार राजरोसपणे अनुभवास येऊन
देखील यावर गंभीरतेने विचार होतांना दिसत नाही. ज्यांना विहित कायद्याच्या चौकटीत
राहून आपले व्यवसाय वा धंदे करता येत नाही त्यांनी राजकारणी व प्रशासनाला अमिष
दाखवत आपली कामे करून घ्यायचा प्रघात असला तरी आता हे लोण कायद्याने वागणा-या व
तशा पापभिरू जनतेपर्यंत येऊन पोहचल्याने ही तोंडाला रक्त लागलेली लाचपिपासू मंडळी
संधी सापडेल तेव्हा आपले अधिकारांचा गैरवापर करत सब घोडे बारा टक्के या न्यायाने
त्यांचे साधारण जीवन हैराण करून टाकत असतात. म्हणजे तुमचे काम कायदेशीर असले तरी
केवळ आम्ही या पदावर आहोत म्हणून आमची खंडणी दिल्याशिवाय तुमचे काम होणार नाही असा
या मंडळीचा खाक्या असतो. एकाद्याने सात्विक संतापाने मुख्यंमंत्र्याकडे तक्रार
करीन म्हणून रोब जमावण्याचा प्रयत्न केला तरी, तुम्हाला कुठे जायचे तिथे जा, आमचे
कुणी वाकडे करू शकणार नाही एवढा राक्षसी आत्मविश्वास या मंडळीला आलेला असतो व तो
ब-याचदा खरा ठरल्याने आपल्या जीवनात व्यावसाईक वा वेगळ्या प्राथमिकता बाळगणा-या
सर्वासामान्यांना या गैरप्रकारांना बळी पडण्याशिवाय गत्यंतर नसते.
अत्यंत सुविहित, सुसंघटितपणे चालणा-या
व्यवस्थेची तुलना आपल्याला प्रशिक्षित करणा-या शिक्षणव्यवस्थेशी करता येईल. आपल्याकडे
प्रशिक्षणाच्या पातळ्या ठरवणारी प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन संस्थांची
उतरंड असते. अशा प्रकारचे शिक्षण घेऊन आपला उध्दार करू इच्छीणा-या वर्गाला पंचायत
व नगरपालिका पातळीवर प्रवेश घेऊन प्राथमिक धडे गिरवावे लागतात. त्यात ओळख व
पारंगतता आली की राज्य पातळीवर आमदारांच्या विद्यालयात प्रवेश मिळतो. त्यातही
ब-यापैकी खेळता आले तर केंद्राच्या महाविद्यालयीन पातळीपर्यंत मजल गाठता येते.
यातले काही घाईगर्दीत काही चूका घडल्याने नापास होत रदबादलही होतात. मात्र या
सा-यांना तुम्ही कुठल्याही शाळेचे (म्हणजे पक्षाचे) असा, भ्रष्टाचाराच्या बाबतीत
ही सारी व्यवस्था तुम्हाला अभय देत शेवटपर्यंत काहीही झाले तरी वाचवायचा प्रयत्न
करील असे एक अलिखित आश्वासन असते व ते आजवर अनेकवेळा सिध्दही झाले आहे.
आज पंचायत सदस्यापासून ते
नगरसेवकापर्यंत सा-यांचे काय धंदे असतात हे जगजाहीर झाले आहे. नगरसेवक ही व्यक्ती
राहीली नसून एक संस्था झाली आहे. आपल्या प्रभागातील व्यवसाय, धंदे, स्वयंरोजगार,
फेरीवाले यांची इत्यभूत माहीती गोळा करणारे नगरसेवकांचे कार्यकर्ते डोळ्यात तेल
घालून राखण करीत असतात. या सा-याकडून गोळा केली जाणारी खंडणी त्यांच्या वैधअवैधतेचा
विचार करून ठरवली जाते व त्यानुसार तिच्या संकलनाची एक संघटित व्यवस्था कार्यरत
असते. या मार्गात येणा-यांचा बंदोबस्त करण्याचे मार्गही ठरलेले असतात व
त्याविरोधातील तक्रारी वॉर्ड आफीसर ते आयुक्त, एवढेच नव्हे तर पोलिसदेखील घेत
नाहीत एवढी दहशत माजवली जाते. व्यावसाईकांना आपला व्यवसाय महत्वाचा असतो व त्यात
येणारे असे अडथळे त्यांना व्यवसायाच्या दृष्टाने परवडणारे नसतात. ते गुमानच नव्हे
तर या घटकांशी आपली जवळीक कशी होईल हे पहात त्यांच्या मागण्या झेपवणा-या असोत वा
नसोत मान्य करतात व महागाई वाढवत त्याची भरपाई आपल्याच ग्राहकांकडून वसूल करतात. या
सा-या व्यवस्थेत त्या नगरसेवकाचा पक्षशाखा प्रमुख, वॉर्ड अधिकारी व पोलिस हे
प्रमुख लाभार्थी असतात व त्याचा वाटा पक्षप्रमुखांना, नगरपालिकेतील वरिष्ठ
अधिका-यांना व नगरविकास खात्याचे अधिकारी व मंत्र्यांना जात असतो.
आज प्रत्येक वॉर्डात फेरीवाले वा
स्वयंरोजगार करणारे भाजीपाला विकणारे असोत हे खंडणी भरूनच व्यवसाय करीत असतात. जो
देणार नाही त्याच्या विरोधात अतिक्रमण विरोधी कारवाई ठरलेली व नव्याने धंद्याची
परवानगी घेतांना झालेल्या मांडवलीत वाढत्या रकमेची खंडणी ही शिक्षा ठरलेली. अशी उदाहरणे
डोळ्यासमोर घडत असल्याने कुठलीही ताकद नसलेला सामान्य व्यावसाईक या व्यवस्थेत आपले
स्थान निश्चित करतो व मनाला बोचत असून देखील त्यांना सामील होतो. अलिकडे काही
महानगरात काही वसाहतीत काही नागरिकांच्या गाड्या फोडण्याचे प्रकार वारंवार होतांना
दिसतात. यामागे ही खंडणी वसूल करण्याच्या भागाच्या वा रकमेच्या वाटणीतील भांडणाचा
परिपाक असतो. आमच्या भानगडीत पडू नका नाहीतर आम्ही काहीही करू शकतो या गर्भीत
धमकीमुळे सा-या शहरात जणू शांतता राबते आहे असे भ्रामक चित्र कायदा व सुरक्षचेची
जबाबदारी असणारे पोलिसही करीत असतात. प्रत्यक्षात मात्र सारी शहरे एका
ज्वालामुखीच्या तोंडावर आलेली असतांना त्याचा उद्रेक होण्याचीच वाट ही
सामान्यांच्या रक्षणाचा वैधानिक अधिकार घेऊन बसलेली सरकार नावाची व्यवस्था बघते
आहे का याचीच शंका येते.
डॉ. गिरधर पाटील ९४२२२६३६८९.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा