पक्ष नव्हे, व्यवस्था ओळखा !!
मानवी जीवनावर अधिपत्य गाजवणा-या सर्व शक्ती मग
त्या धर्म, वंश, बळ, सरंजाम असोत त्या ओलांडत आज आपण सारे एका नव्या अर्थवादी
कालखंडात येऊन पोहचलो आहोत. बदल हा कितीही नकोसा असला तरी तो अपरिहार्य असतो व या
बदलाच्या दिशा वा साध्य समजून घेण्यात कुचराई झाली तर आपण सारे, जी एक सरकार वा
नागरिक म्हणून परिस्थिती अनुभवतो आहोत तिला तोंड द्यावे लागते. देशातील वा
देशाबाहेरील बदलांना सर्वसामान्य जनता ज्या लवचिकतेने सामोरे जाते त्यामानाने
सरकारांना ते बदल स्विकारणे जड जात असल्याने जनतेच्या आशाआकांक्षा व सरकारची त्या
पुरे पाडण्याच्या क्षमता यात तफावत पडत अनेक संघर्षस्थळे निर्माण होत केवळ असंतोष,
अस्वस्थताच नव्हे तर अराजकाचीही परिस्थिती येऊ शकते. आज महाराष्ट्रातच नव्हे तर
सा-या राज्यात काही अस्वस्थ समाजातील उद्रेक ज्या विविध मार्गानी प्रकट होतोय
त्यानी उर्वरित देशच नव्हे तर सरकारेही अचंबित झाल्याचे दिसते आहे. इतर राज्यातील
या असंतोषाला सरकारला सहज मिळालेल्या हत्यांरामुळे काबीज करता आले तरी त्यापासून
धडा घेत महाराष्ट्रातील आंदोलने ज्या अराजकीय, नेतृत्वविहित, अहिंसक मार्गाने आपले
शक्ती प्रदर्शन करताहेत त्यानी सा-या राजकीय व्यवस्थेला बुचकाळ्यात टाकले आहे.
अर्थात या सा-या परिस्थितीचे आकलन वा मूल्यमापन झापडबंद पध्दतीने करत त्यातल्या
राजकीय संधी हुडकण्याचा प्रयत्न झाला तर पुढील काळात हे प्रश्न सोडवण्यात अडचणी
येऊ शकतात.
या आंदोलनाला अराजकीय ठेवण्याचा प्रयत्न
हा कुठल्याही राजकीय पक्षाला लक्ष्य करण्यापलिकडचा असून केवळ आपल्यावरील अन्याय
अधोरेखित करत तो दूर करण्याची जबाबदारी सा-यांवर असल्याचे दाखवून दिले आहे. आजवरचा
हा सारा अन्यायाचा अनुशेष कुणा पक्षीय धोरणाने वा सत्ताबदलाने ते दूर होईल हा भ्रम
दूर करत त्याच्या शक्यता बाजूला सारत एकंदरीतच ही व्यवस्था कशी काम करते याचे एक
परखड व नागडे विच्छेदन या निमित्ताने झाले आहे. जनहिताशी तडजोडी करत आपल्या
सत्ताकारणासाठी अनैतिक चुंबाचुबी करणा-या पक्षांचे हेतु संशयास्पद ठरू लागल्याने
जनताही आता हतबल झाल्याचे दिसते आहे. मागच्या निवडणुकीत अगोदरच्या सरकारच्या चूका
व गलथानपणाचा फायदा घेत एका नव्या आशादायक पर्वाचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या
पक्षांनीही काही भरीव काम केल्याचे दिसत नाही. याचाच अर्थ हे सारे प्रश्न, त्यांचे
आकलन वा सोडवणूक पक्षीय कार्यक्षेत्राच्या परिघाबाहेर गेले असून उपाययोजनांच्या
बाबतीत समाजधुरीणांना नवीन मांडणी करावी लागेल.
आज मराठा समाजातील अन्यायाला तोंड फुटले
असले तरी असंतोष कुठे नाही ? एक सर्वसामान्यांच्या शोषणावर पुष्ट झालेली राजकीय व्यवस्था
सोडली तर संतोष कुठेही दिसत नाही. उत्पादन, व्यापार, शेती, शिक्षण, आरोग्य, रस्ते,
वीज, ग्रामीण अर्थव्यवस्था, महिला, बाल युवा या सा-या क्षेत्रात आवश्यक बदलांचा एक
प्रचंड अनुशेष साचला असून त्यापुढे आपली व्यवस्था ढिम्मपणे बसल्याचे दिसून येते.
काही बदलांचे निर्णय सरकारला घ्यावे लागलेले असले तरी अंमलबजावणीत अपयश आल्याने
त्यांच्या लाभापासून वंचित रहावे लागते आहे. जगातील झपाट्याने येणा-या बदलांना
देशातील जनता सामोरे जायला तयार असली तरी त्याबाबतच्या सरकारच्या भूमिका या तशा
अनुरूप नसल्याने ही कोंडी झालेली दिसते. सत्ता बदलली, पक्ष बदलले तरी किमान
अपेक्षा पूर्ण करण्याची कसोटीही ही व्यवस्था देऊ शकलेली नाही. या सा-या व्यवस्था
बदलात सरकारच्या काही अपरिहार्यता आहेत वा आपणच सारे त्याला जबाबदार आहोत का याचाही
यानिमित्ताने आढावा घ्यायला हरकत नाही. व्यवस्थेत बदल होत नसेल तर तो का होत नाही
याच्या दिशेने आता प्रयत्न व्हायला हवेत. नाही तर जातीच्या नावाने परंतु ख-या
अर्थाने वेगळी कारणमीमांसा या सा-या उद्रेकाची उकल न होता परिस्थिती अधिकच गंभीर
होत धोकादायक ठरू शकेल.
आता जनतेच्या आशाआकांक्षाचा अनुशेष
तुकड्यातुकड्यात दूर करण्याचा कार्यक्रम मांडला जाईल. त्याला घटना, लोकशाही,
न्यायालये व सरकारच्या कार्यपध्दतीचे संरक्षण देत जे करायचे तेच केले जाईल. यात
व्यवस्थाबदलापेक्षा मागण्यांचे खच्चीकरणच केले जाण्याचा धोका संभवतो. यासाठीच्या
उपाय योजनांची थोडी दिर्घकालिन वा क्लिष्ट वाटली तरी दिशा काय असावी हे समजून घेणे
महत्वाचे आहे. सरकारची कार्यक्षमता, कार्यतत्परता व संवेदनशीलता या सा-या
पातळ्यांवर काम करावे लागेल. ही त्रिसुत्री सर्वस्वी सरकारचे प्रमुख घटक असलेले
लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यावर अवलंबून असते. या दोन्ही घटकांच्या मानसिकतात आज
जे काठिण्य आले आहे ते त्यांना जनहितासाठीच दिलेल्या अभेद्य व अतिसंरक्षणामुळे आले
आहे. एकदा निवडून आले की पाच वर्षांसाठी मी माझ्या मनाचा राजा. या पाच वर्षात मी
माझी सार्वजनिक जबाबदारी पार पाडली नाही तरी सारे अधिकार व लाभ घ्यायला मोकळा.
घटनेद्वारा मिळालेले वैधानिक लाभ तर आहेतच, बदलत्या राजकीय परिस्थितीत
जनहितापेक्षा वेगळे निर्णय घ्यायचे लाभही ते पदरात पाडून घेतात. यात
लोकप्रतिनिधित्व या तत्वालाच हरताळ फासला जात असल्याने त्यांच्या निर्णयगृहात जनतेच्या
हिताचे जे काही निर्णय वा कायदे व्हायला हवेत ते न होता सारी राजकीय व्यवस्था
आपापल्या तुंबड्या भरण्यात व्यस्त झाली आहे. या सा-या लोकप्रतिनिधिची जबाबदेही
निश्चित करत त्यात काही त्रुटी आढळल्यातर त्याचे लोकप्रतिनिधित्व काढून घेण्याचे
हत्यार विकसित झाले पाहिजे व त्यांना लोकशाहीत अपेक्षित असलेले विहित कर्तव्य
करण्यास बाध्य केले पाहिजे. दूर्दैवाने ते आज होत नाही.
राहिला प्रश्न प्रशासनाचा. एकदा सरकारी
नोकरीत चिकटले की सा-या जन्माची ददात मिटते या घटनादत्त संरक्षणामुळे आश्वासित
झालेल्या प्रशासनावर कुठलाही अंकुश राहिलेला नाही. जे काही अंकुश असल्याचे दाखवले
जाते ते पाळण्याची व पडताऴण्याची व्यवस्था त्यांच्याच हातात असल्याने तिलाही ते
फारसे जुमानत नाहीत. आपण काहीही केले तरी आपल्या नोकरीवर गदा येत नसल्याचे राक्षसी
संरक्षण मिळाल्याने लोकांना सेवासुविधा मिळण्याऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाच्या
त्र्याहत्तर टक्के महसूल फस्त करणारी ती एक पगारवाटप यंत्रणा झाली आहे.
या दोन्ही घटकांना जनहितासाठी कामाला
जुंपण्याचे काम आपल्या सा-यांना करावे लागणार आहे.
डॉ. गिरधर पाटील 9422263689