सामर्थ्य एकजूटीचे !!
नुकताच आपण
भारतीय गणतंत्र दिवस साजरा केला. खरं म्हणजे करावा लागला कारण तशी प्रथा वा परंपरा
आहे. सरकार नामक व्यवस्थेला आपले अस्तित्व व त्यातून आपली ताकद दाखवण्याची ही नामी
संधी असते. भोळ्या जनतेला देशाभिमानाच्या नावाने काही काळ गुंगवता येते. खरं
म्हणजे गणतंत्र हे देशातील सा-या जनतेचे असते व त्याचे लाभ सर्वांना समानतेने
मिळावेत अशीही अपेक्षा असते. मात्र या पार्श्वभूमीवर भारतीय गणराज्याने शेतक-यांना
दिलेली सर्वात मौल्यवान भेट म्हणजे आत्महत्या. देशाचे पोट भरण्याची यापेक्षा
चांगली परतफेड कुठल्या मार्गानी झाली असती ? खरं
म्हणजे अशा शुभेच्छा व्यक्त करतांनाच त्यांच्यातला फोलपणा प्रत्येकाला जाणवत असतो,
समदुःख्खी समाज यापेक्षा वेगळे काय करणार ? शुभेच्छांतील
समाधानाचा भाग संपल्यांनंतर ज्या वास्तवाला तोंड द्यायचे ते अधिकच भीषणतेने
जाणवणार या भितीनेच शहामृगी पवित्रा घेत आपण त्यापासून लांब जाण्यासाठी दिवसेंदिवस
अधिकच धार्मिक, जातीयवादी, सण-समारंभ-उत्सव वा इव्हेंटप्रिय होत आहोत. आपण असे
होणे हे व्यवस्थेला हवेच असल्याने मोठमोठ्या थक्क करणा-या योजनांचा पध्दतशीर
भडीमार करत आपला गोंधळ उडवत आपल्या नेमक्या समस्यांपासून दूर ठेवण्याचा कार्यक्रम
यशस्वीपणे राबवला जात आहे.
प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते असे म्हणतात.
मात्र ती वेळ समजण्याचा शहाणपणा अंगी असावा. शेतक-यांच्या प्रश्नांवर काम करतांना
नेहमी आश्चर्य वाटते की इतक्या जाहीर व उघडपणे होणारा अन्याय, अत्याचार, शोषण कळत
असूनही शेतकरी तो कसा, का व कशासाठी सहन करतात ? खरं म्हणजे हा प्रश्न ज्या
सहजतेने आपण विचारतो त्याच सहजतेने त्याचे उत्तर मिळेल असे वाटत नाही. मागच्या
लेखात मी शेतक-यांच्या असंख्य समस्यांचा उल्लेख केला होता. या समस्या सोडवण्यासाठी
कुठल्याही निधीची वा आर्थिक मदतीची गरज नाही. हवी मात्र काही तरी करण्याची
इच्छाशक्ती. तीच आजच्या व्यवस्थेत नसल्याने आज लाखो शेतकरी प्रशासकीय भ्रष्टाचार व
गैरप्रकारांनी पिडीत आहेत. शेतक-यांनी फोन करून मांडलेली त्यांची दुःख ज्या
प्रमाणात नोंदली गेली त्यावरून सरकारने निदान या बाबतीत काही तरी तातडीने करण्याची
आवश्यकता वाटते. आजच्या सरकारात आपली तक्रार वा गा-हाणे कुठे मांडण्याची सोय नाही.
सारी पोर्टल्स दिखाऊ व निश्क्रिय ठरली आहेत. आजवरच्या अनुभवावरून ही कोडगी
व्यवस्था संवेदनशीलतेने कामाला लागेल असे वाटत नाही तेव्हा शेतक-यांनाच या आघाडीवर
काय करण्यासारखे आहे याची व्यापक चर्चा व त्यातून एक सक्षम कार्यप्रणाली विकसित
व्हावी अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
आपल्याला
ज्यामुळे त्रास होतो ती कारणे काही वेळा स्पष्ट होतात, काही वेळा लक्षात येत
नाहीत. निदान स्पष्ट झालेल्या कारणांवर काय कारवाई करावी हे आपण ठरवू शकतो.
उदाहरणार्थ गाव पातळीवर असणारे सरकार व त्यामुळे उद् भवणा-या समस्यांनी आपण कायम
त्रस्त असतो. दुसरीकडे मुंबई दिल्लीत असणारे सरकार शेतीची धोरणे ठरवत आपलेही
भवितव्य ठरवत असते. परंतु या सा-यांबाबत आपल्याला फारसे काही एक न करता येण्याचे
प्रमुख कारण आहे आपण संघटित नसल्याचे. खरं म्हणजे हा त्रास वा अन्याय वाढता
असण्याचे प्रमुख कारणही आपल्या असंघटितपणातच आहे. या दोन्ही, दिसणा-या व न
दिसणा-या व्यवस्थेला वठणीवर आणण्याचा मार्ग मात्र एकाच दिशेने जातो, तो म्हणजे
गावाकडून मंत्रालयाकडे. गावातील सरकारचे नाक दाबले म्हणजे वरच्या व्यवस्थेचे तोंड
उघडते. ही नाक दाबण्याची क्रियाही फार कठीण आहे असे नाही, उलट गाव पातळीवर
असल्याने कुठेही न जाता केवळ आपल्या पक्क्या निर्धाराने आपण यातून मार्ग काढू
शकतो. या कार्यक्रमाची तपशीलवार चर्चा होऊ शकते.
आज आपली
एकजूट का होत नाही याची निश्चित अशी कारणे आहेत. आपली पूर्वीची गावे आठवून बघा.
गावात एवढ्या विविध प्रकारची फूट नव्हती. आज तर पक्षीय राजकारणाचे बळी ठरत आपण
सारे गावकरी एकमेकांविरूध्द लढत आहोत. आपल्या लढण्यातून वरचे राजकारणी सत्तेची मलई
खात असतात. यात एक पक्ष चांगला व दुसरा वाईट असे नसून राजकारणात असलेले सारे एका
विशिष्ट मानसिकतेचेच असून स्वार्थ हा त्यातला मूलगामी उद्देश असतो. आज या
व्यवस्थेत एकादा प्रामाणिक कार्यकर्ता येऊन टिकू शकेल याची सुतराम शक्यता
नाही. त्यामुळे आजच्या राजकारण्यांबाबत
फारशी चिंता करण्याचे कारण नाही. साध्या साध्या गोष्टींसाठी आपण या व्यवस्थेच्या
पायाशी लोळण घ्यावी अशी यांची कार्यपध्दती असते. जी कामे करणे हे सरकारचे विहित
कर्तव्य असते ती एकाद्या पुढा-याने केलीत तर त्याच्या उपकाराचे ओझे आपल्याला
जन्मभर ओढावे लागते. काही कामे पैसे देऊनच होतात असा आपलाही गैरसमज असतो व अमका
होता म्हणून आपले स्वस्तात काम झाले अशाही भ्रमात आपण सारे असतो. खरं म्हणजे लोक
प्रतिनिधी खमक्या असला तर तलाठी काय वा ग्रामसेवक काय लोकांची कामे न करण्याची
यांची टाप नसते. मात्र आपल्या पुढा-यांची सा-या प्रशासनाशी मिलीभगत असते व आलेली
वरकमाई सारे वाटून घेत असतात. आज शहरांजवळच्या शेतजमींनीच्या किंमती बघता साध्या
तलाठ्याच्या बदलीचे दर कुठे पोहचले आहेत याची जरा गावातून माहिती घ्यावी.
या
पार्श्वभूमीवर या नव्या जमान्यातल्या शेतक-यांवर असा विचार करून आपले क्षेत्र
सावरण्याचे, बळकट करण्याचे, त्यातून आपली व देशाची समृध्दी साधण्याचे एक मोठे
आव्हान उभे आहे व शेतक-यांची आजची नवी पिढी ते निश्चितच पेलवू शकेल. भिती वाटते ती
आपल्या संघटित होण्याच्या प्रयत्नांची, आजवर अडथळा ठरत आलेली सरकारी धोरणे व नीती
यांची. भारतातील राजकीय व्यवस्थेत निर्णय प्रक्रिया सरकारवर वर्चस्व ठेऊन असल्या
शोषक घटकांच्या हातात गेल्याने सर्वसामान्यांचे निर्णय ज्या पध्दतीने, वेगाने
व्हायला हवेत, तसे होत नसल्याने आपली क्षमता व कर्तृत्व असून देखील त्यांना वाव
मिळत नाही.
आशेचा किरण
एवढाच आहे की आता उत्पादन, व्यापार व बाजार हे सारे या अर्थवादी काळात सरकार
नावाच्या व्यवस्थेच्या पकडीतून हळूहळू सुटत जाणार आहेत व व्यावहारिक तत्वांवर
व्यापक हितांचे रक्षण करणारी व्यवस्था उदयास येऊ घातली आहे. या सा-या प्रक्रियेत
उत्पादक शेतकरी म्हणून आपली महत्वाची भूमिका राहणार आहे. सा-या कृषिक्षेत्राने
आलेली मरगळ झटकत आपल्या हक्कांसाठी सिध्द व्हावे. एवढं जरी असलं तरी या निमित्ताने
गणतंत्र दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा !! शेतक-यांनासुध्दा
!!
डॉ. गिरधर पाटील.
९४२२२६३६८९.